कोरोनाच्या भीतीने लग्न उरकण्याची घाई, त्यात मुहूर्त कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 12:02 PM2021-12-25T12:02:31+5:302021-12-25T12:03:04+5:30

पुन्हा निर्बंध आले तर २५ माणसांत लग्न उरकावे लागेल. त्यापेक्षा जरा घाई करून जानेवारीत वधू-वरांचे हात पिवळे करण्याकडे लोकांचा कल आहे.

Hurry to get the wedding ceremony early for fear of Corona | कोरोनाच्या भीतीने लग्न उरकण्याची घाई, त्यात मुहूर्त कमी

कोरोनाच्या भीतीने लग्न उरकण्याची घाई, त्यात मुहूर्त कमी

googlenewsNext

कोल्हापूर : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढला तर विवाह सोहळ्याला ब्रेक लागू नये म्हणून या महिन्यातच लग्न उरकण्याची घाई सुरू झाली आहे. केंद्र सरकारने वेळ पडली तर रात्रीची संचारबंदी करा, असे सांगितले आहे. या व्हेरिएंटचा धोका कमी असला तरी संसर्गाचे प्रमाण खूप मोठे आहे, त्यामुळे पुन्हा नागरिकांवर निर्बंध येण्याची शक्यता असल्याने या १५ दिवसांतील लवकरात लवकर असेल ते मुहूर्त काढले जात आहेत.

गेली पावणे दोन वर्षे सगळ्या जगाला वेठीला धरलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत परदेशांमध्ये कोरोना ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे आता भारतातदेखील ही लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवाळीपासून शासनाने जवळपास सगळे निर्बंध उठविले आहेत; पण आता पुन्हा संसर्गाचा धोका वाढल्याने राज्य सरकारने रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे पुन्हा कडक निर्बंधांची शक्यता आहे.

जानेवारीत मुहूर्त कमी

जानेवारी महिन्यात पहिल्या १५ दिवसांत एकही विवाह मुहूर्त नाही. त्यानंतर २०, २२, २३, २७, २९ हे पाचच दिवस मुहूर्त आहेत. फेब्रुवारी महिन्यात सहा दिवस तर मार्चमध्ये सर्वांत कमी फक्त चार मुहूर्त आहे. एप्रिलमध्ये आणि त्यापेक्षा मे महिन्यात सर्वाधिक मुहूर्त आहेत.

२५ माणसांत लग्न नको...

कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून गेल्या पावणे दोन वर्षांतील दीड वर्ष लोकांना २५ ते ५० माणसांमध्ये विवाह सोहळे अक्षरश: उरकावे लागले आहेत. करवलींची धम्माल नाही, वरातीत नाचणं नाही, मेहंदीपण घरातल्या घरात, संगीताचा कार्यक्रम झाला नाही. लग्नाला मोजकेच नातेवाईक, मित्र परिवाराला निमंत्रणच नाही. सगळ्यांना एकदम बोलावता येत नाही म्हणून प्रत्येक सोहळ्याला वेगवेगळ्या नातेवाइकांना बोलवायचे अशी तडजोड करावी लागली. आता दिवाळीनंतर कुठे धूमधडाक्यात विवाह सोहळे होत आहेत. पुन्हा निर्बंध आले तर २५ माणसांत उरकावे लागेल. त्यापेक्षा जरा घाई करून जानेवारीत वधू-वरांचे हात पिवळे करण्याकडे लोकांचा कल आहे.

जानेवारीत विवाह मुहूर्त कमी आहेत, त्या दिवशी एकाच विवाह सोहळ्यासाठी कार्यालय देता येते. किमान दीड दिवस कार्यालय बुक असते. त्यामुळे पहिल्यांदा आलेल्या पार्टीकडून कार्यालय बुक झाले की दुसऱ्यांना देता येत नाही. कोरोनामुळे लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे अजूनही म्हणावे तसे बुकिंग होत नाही. -सुशील जवळगेकर, मंगल कार्यालय चालक

Web Title: Hurry to get the wedding ceremony early for fear of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.