ZP Election: अंबाबाई दर्शनासाठी पुण्यातून शंभर आरामबस, शहरातील वाहतुकीवर ताण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 14:50 IST2022-02-28T14:49:00+5:302022-02-28T14:50:19+5:30
राज्यातील काही जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर इच्छुक उमेदवारांकडून सहली आयोजित

ZP Election: अंबाबाई दर्शनासाठी पुण्यातून शंभर आरामबस, शहरातील वाहतुकीवर ताण
कोल्हापूर : पुण्यातील जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असणाऱ्या एका उमेदवाराने सुमारे शंभर लक्झरी बसगाड्यांतून महिला मतदारांना रविवारी कोल्हापूर शहरात अंबाबाईच्या दर्शनासाठी आणले होते. या आरामबसमुळे शहरातील वाहतुकीवर त्याचा ताण पडला.
भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याने लक्ष्मीपुरी, ताराबाई रोड, महाद्वार रोड, भाऊसिंगजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा टॉवर परिसरातील रस्ते गजबजून गेले.
राज्यातील काही जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्याची केव्हाही घोषणा होऊ शकते, आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनाच्या सहली आयोजित करण्याचे आडाखे बांधले आहेत.
रविवारी अशाच सुमारे दीडशे ते दोनशे लक्झरी बसेसमधून मतदारांना कोल्हापुरात आणले गेल्यामुळे शहरातील ठराविक रस्त्यांवर मोठी गर्दी उसळली.
कोरोना संसर्गाच्या काळात तब्बल दोन वर्षे श्रीमंतांचे पर्यटनच काय तर सर्वसामान्य नागरिकांनाही घराबाहेर पडता आले नाही. आता हा संसर्ग कमी होत आहे आणि तोंडावर महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणूका आहेत.
या संधीचा फायदा घेत वेगवेगळ्या शहरांतील इच्छुक उमेदवारांनी मतदारांसाठी अंबाबाई दर्शनाचे दौरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. एक दिवसाची सहल, देवीचे दर्शन तसेच एक वेळचा चहा-नाश्ता व जेवण मिळत असल्याने मतदारांचाही याला प्रतिसाद मिळणार यात शंका नाही.
रंकाळा परिसरात बसेस पार्किंग
कोल्हापुरात आलेल्या सर्व लक्झरी बसेस या रंकाळा टॉवर ते तांबट कमान या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग कराव्या लागल्या. दुपारच्या वेळी या रस्त्यावरून अन्य वाहनधारकांना वाहने चालविणे अवघड गेले. दसरा चौक, बिंदू चौक येथील पार्किगच्या जागा आधीच फुल्ल होत्या. त्यामुळे छोटी वाहने मिरजकर तिकटी, के. भो. नाट्यगृह, खरी कॉर्नर परिसरातही थांबवावी लागली. पार्किंगला जागा मिळणे मुश्कील झाले होते.