जमीन आमची मग आम्हाला रस्ता का नाही?; संतप्त कोल्हापुरकरांचे विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:09 IST2025-11-24T13:07:26+5:302025-11-24T13:09:45+5:30
तामगावला जाणारा रस्ता विमानतळ प्राधिकरणाने अडवल्यामुळे कोल्हापूर विमानतळाबाहेर मोठा राडा झाला आहे.

जमीन आमची मग आम्हाला रस्ता का नाही?; संतप्त कोल्हापुरकरांचे विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन
Kolhapur Protest : विमानतळ प्रशासनाने कोणताही पर्यायी रस्ता न देताच उजळा ई वाडी आणि तामगांवला जोडणारा महत्त्वाचा रस्ता बंद केल्याने हजारोच्या संख्येने संतप्त ग्रामस्थांनी आज विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आक्रमक ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स ढकलून देत आंदोलकांनी थेट मुख्य गेटवर धडक दिली. "नाही कुणाच्या बापाचा रस्ता, आमच्या हक्काचा!" अशा जोरदार घोषणाबाजीने आंदोलकांनी विमानतळ परिसर दणाणून सोडला आहे.
आंदोलनाची तीव्रता
आंदोलकांनी प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'विमानतळासाठी आमच्या जमिनी गेल्या आहेत, मग आम्हाला रस्ता का नाही?' असा संतप्त सवाल आंदोलक विचारत आहेत. या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे, त्याही मोठ्या उत्साहाने घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध करत आहेत.
प्रशासनाची उदासीनता
हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले असतानाही, विमानतळ प्रशासनाचा एकही अधिकारी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी किंवा परिस्थिती हाताळण्यासाठी घटनास्थळी उपस्थित नसल्याने आंदोलक अधिक आक्रमक झाले आहेत.
आंदोलनाच्या तीव्रतेमुळे मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, परंतु आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत. ग्रामस्थांच्या मते, हा रस्ता बंद झाल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे आणि पर्यायी व्यवस्था करणे हे प्रशासनाचे कर्तव्य होते. जोपर्यंत प्रशासनाचा कोणताही अधिकारी येऊन ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.