आणखी किती बळी घेणार? बिऊर येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू; संतप्त जमावाने वनविभागाचे कार्यालय फोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 18:54 IST2026-01-31T18:52:32+5:302026-01-31T18:54:57+5:30
यावेळी वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईल बंद असल्याचे नागरिकांनी सांगितले. वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांचे निलंबन करावे तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता अखेर रात्री १२:३० वाजता ठोस आश्वासन मिळाल्यावर शवविच्छेदन करण्यात आले.

फोटो - विकास शहा
शिराळा - बिऊर (ता. शिराळा) येथील अमृतनगर येथे बहीण भाऊ खेळत असताना अचानक बिबट्याचे हल्ला केल्याने या हल्ल्यात राजवीर हणमंत पाटील (वय ६) याचा मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवार दिनांक ३० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.या घटनेनंतर हजारो नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. यावेळी वनविभागाचे कोणत्याही अधिकाऱ्यांनी फोन उचलले नाहीत व घटनास्थळी न आल्याने संतप्त जमावाने वनविभागाचे कार्यालय फोडले.यावेळी एक कर्मचारी पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला.
यावेळी घटनास्थळ व उपजिल्हा रुग्णालय परिसरात मिळालेली माहिती अशी, राजवीर व त्याची मोठी बहीण कार्तिकी (वय ४वर्षे ) आपल्या घरातून शेजारी घरात खेळत जात होते.यावेळी अचानक बिबट्या ओढ्याच्या बाजूने शेतातून येऊन राजवीरवर हल्ला केला.यावेळी बिबट्याने गळ्याला पकडले व तोंडांत धरून ओढत सुमारे पाचशे फुटावर शंकर केरु पाटील यांच्या शेतापर्यंत फरफटत नेले.यावेळी सोबत असणारी बहीण कार्तिकी ओरडल्याने घरातील लोक व नागरिक जमा झाले. तोपर्यंत बिबट्याने फरफटत नेले नागरिकांच्या आरडाओरडा मुळे तसेच राजवीरचे चुलत आजोबा शंकर श्रीपती पाटील यांनी बॅटरी धरून उजेड पडला हा उजेड बिबट्या च्या तोंडावर पडल्याने राजवीर ला तेथेच टाकून पळून गेला. ओढ्यालगत गेले असता त्यांनी बॅटरीच्या झोतात पाहिले असता राजवीर जख्मी अवस्थेत आढळून आला.
जखमी राजविरला पंडित शंकर पाटील, बजरंग पांडुरंग पाटील, शशिकांत पाटील, कृष्णात पाटील, महादेव भीमराव पाटील, पोपट पाटील, राजू शंकर पाटील, रमेश पाटील, राजेंद्र पाटील, अक्षय पाटील यांनी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तो मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
उपजिल्हा रुग्णालयात माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सत्यजीत देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक, मनिषा नाईक , विराज नाईक,रणधीर नाईक, माजी सभापती सम्राटसिंग नाईक,सत्यजीत नाईक, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक,सुखदेव पाटील,रेणुकादेवी देशमुख, साईतेजस्वी देशमुख, तहसीलदार शामला खोत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, नायब तहसीलदार विठ्ठल पाटील आदींनी भेट दिली.
वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईल बंद? -
यावेळी वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांचे मोबाईल बंद असल्याचे नागरिकांनी सांगितले. वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांचे निलंबन करावे तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता अखेर रात्री १२:३० वाजता ठोस आश्वासन मिळाल्यावर शवविच्छेदन करण्यात आले.
आणखी किती बळी घेणार? -
जुलै २०२५ मध्ये गिरजवडे-मुळीकवाडी येथे एका ४ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ल्या करून जखमी केले होते.बिऊर पासून तीन किलोमीटर अंतरावरील तडवळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ११ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला होता. याच जवळील उपवळे येथे ७ जानेवारी रोजी बिबट्याने ९ वर्षीय बालिकेवर झडप घालून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ११ वर्षांच्या भावाने जीवाची पर्वा न करता बहिणीचा पाय पकडून तिला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढले. या धाडसामुळे आणि आईने केलेल्या आरडाओरडामुळे स्वरांजली संग्राम पाटील या बालिकेचे प्राण वाचले आहेत
६:४५ दत्तात्रय सर्जेराव पाटील याने या परिसरात हा बिबट्या पहिला त्यावेळी त्यांनी काहींना याबाबत मोबाईल वरून सांगितले आणि अवघ्या पंधरा मिनिटात ही घटना घडली.या घटनेनंतरही अर्ध्यातासाने हा तोंडाला रक्त लागलेला बिबट्या याच परिसरात आला होता.आता हा बिबट्या चौथ्यांदा सव्वा नऊच्या दरम्यान याच परिसरात आला यामुळे नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली रात्री साडे अकरा वाजता पुन्हा याठिकाणी मयत राजवीर याचे वडील हणमंत पाटील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.