Kolhapur: सर्किट बेंच तर झालं.. आता वेध महसूल, पोलिस आयुक्तालयाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:06 IST2025-08-08T17:05:40+5:302025-08-08T17:06:00+5:30

कोल्हापूरच्या विकासातील टर्निंग पॉइंट : पोलिस आयुक्तालयाच्या मागणीलाही बळ

Hopes of opening of divisional revenue, police commissionerate in Kolhapur due to circuit bench | Kolhapur: सर्किट बेंच तर झालं.. आता वेध महसूल, पोलिस आयुक्तालयाचे

Kolhapur: सर्किट बेंच तर झालं.. आता वेध महसूल, पोलिस आयुक्तालयाचे

कोल्हापूर : गेल्या १० ते १२ वर्षात कोल्हापूरच्या वाट्याला किरकोळ अपवाद वगळता ठोस विकासात्मक अशी कोणतीच योजना मिळाली नाही. सर्किट बेंचची मंजुरी हा कोल्हापूरच्या विकासासाठी टर्निंग पॉइंट ठरणार असल्याचा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. सर्किट बेंचमुळे विभागीय महसूल आयुक्तालय कोल्हापुरात सुरू होण्याच्या आशा उंचावल्या आहेत. तसेच पोलिस आयुक्तालयाच्या मागणीलाही बळ मिळाले आहे.

राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत कोल्हापूरचा विकास फारसा गतीने झाला नाही. शेती, साखर कारखाने, दुग्धोत्पादन, फाऊंड्री यासह इतर शेतीपूरक उद्योगांवरच जिल्ह्याच्या विकासाची भिस्त होती. पुणे, छत्रपती संभाजीनगरसारखे मोठे प्रकल्प कोल्हापूरला मिळाले नाहीत. आयटी क्षेत्रालाही अपेक्षित गती मिळाली नाही. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळण्यासाठी खंडपीठ मंजुरीकडे सर्वांच्याच नजरा होत्या. अखेर सर्किट बेंचच्या मंजुरीमुळे कोल्हापूरच्या अर्थकारणाला गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले.

यासोबतच कोल्हापूरला विभागीय महसूल आयुक्तालय सुरू व्हावे, या मागणीने जोर पकडला आहे. सर्किट बेंचअंतर्गत असलेल्या सहा जिल्ह्यांसाठी महसूल आयुक्तालय सुरू झाल्यास याचा लाभ कोकणसह दक्षिण महाराष्ट्राला होणार आहे. असा निर्णय झाल्यास पुणे आणि मुंबईवरील प्रशासकीय ताण काहीसा कमी होऊ शकतो.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जिल्हा बार असोसिएशनने १८ फेब्रुवारी २०२५ मध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देऊन विभागीय महसूल आयुक्तालयाची मागणी केली आहे. राज्यातील सातवा महसुली विभाग कोल्हापुरात सुरू करावा, असा आग्रह यातून धरला आहे. हे निवेदन राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी बार असोसिएशनला कळवली आहे. कोल्हापूर फर्स्ट या संस्थेकडूनही विभागीय आयुक्तालयाचा मुद्दा शासनदरबारी मांडला जाणार आहे, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

पोलिस आयुक्तालय गरजेचे

कोल्हापुरात पोलिस आयुक्तालय सुरू व्हावे, अशी मागणी गेल्या १५ वर्षांपासून आहे. मात्र, राज्य सरकारने याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. आता सर्किट बेंच मंजुरीमुळे पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. जबाबदारी वाढल्याने पोलिस आयुक्तालयाला मंजुरी मिळणे गरजेचे बनले आहे. यासाठी लोकप्रतिनिधींना प्रयत्न करावे लागणार आहेत.

सर्किट बेंचमुळे कोल्हापूरच्या विकासाला बूस्ट मिळणार आहे. स्थानिक सुविधा, दळणवळण, पर्यटन, सेवाक्षेत्राचाही विस्तार होण्याची संधी आहे. मोठ्या कंपन्या कोल्हापुरात येतील. यातून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. महसूल आयुक्तालयासाठी आता प्रयत्न गतिमान होतील. - ॲड. सर्जेराव खोत - माजी अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन

Web Title: Hopes of opening of divisional revenue, police commissionerate in Kolhapur due to circuit bench

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.