Kolhapur News: सोलरसाठी लोखंडी पाईप टेरेसवर चढवताना विजेचा धक्का, घरमालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:41 IST2025-12-03T12:40:22+5:302025-12-03T12:41:32+5:30
तरुण जखमी, शिवाजी पेठेतील दुर्घटना

Kolhapur News: सोलरसाठी लोखंडी पाईप टेरेसवर चढवताना विजेचा धक्का, घरमालकाचा मृत्यू
कोल्हापूर : नवीन सोलर बसविण्यासाठी लोखंडी पाईप टेरेसवर चढवताना महावितरणच्या विद्युत तारेला स्पर्श होऊन विजेच्या धक्क्याने घरमालक रवींद्र रंगराव जाधव (वय ५२, रा. आयरेकर गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला. त्यांना मदत करण्यासाठी गेलेला सौरभ संजय साळुंखे (वय २४, सध्या रा. अंबाबाई यात्री निवास, ताराबाई रोड, कोल्हापूर, मूळ रा. तासगाव, जि. सांगली) हा जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. २) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
सीपीआरच्या अपघात विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र जाधव यांच्या घराच्या टेरेसवर नवीन सोलर बसवायचा होता. त्यासाठी लोखंडी पाईप टेरेसवर चढवायच्या होत्या. मंगळवारी दुपारी त्यांनी ओळखीतील तरुण सौरभ साळुंखे याला पाईप वरती चढविण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. दोरीने बांधलेल्या पाईप जाधव टेरेसवर ओढून घेत होते.
काही पाईप चढवल्यानंतर एक पाईप हातात पकडताच ती तिरकी होऊन महावितरणच्या विद्युत तारेला चिकटली. विजेचा धक्का बसताच त्यांनी आरडाओरडा केला. हा प्रकार लक्षात येताच सौरभ त्यांच्या मदतीसाठी जिन्यातून टेरेसवर गेला. त्यावेळी तोही विजेच्या धक्क्याने जखमी झाला, तर जाधव हे रस्त्यावर पडले.
गल्लीतील नागरिकांनी तातडीने दोघांना खासगी वाहनातून सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारापूर्वीच जाधव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. सौरभ याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
कटुंबीयांना धक्का
रवींद्र जाधव यांचा बाटलीबंद पेयजल विक्रीचा व्यवसाय होता. ते शिवाजी तालमीचे माजी अध्यक्ष होते. दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांना धक्का बसला. त्यांनी सीपीआरच्या अपघात विभागाबाहेर हंबरडा फोडला. जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, आई असा परिवार आहे.
सौरभचे नशीब बलवत्तर
घरची परिस्थिती बेताची असल्याने तासगावचा सौरभ साळुंखे हा अंबाबाई यात्री निवासमध्ये राहून पार्टटाईम काम आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो. वाचनालयात एकत्र भेटत असल्याने सौरभ आणि रवींद्र जाधव यांची ओळख होती. याच ओळखीतून तो जाधव यांना मदत करण्यासाठी गेला होता. विजेचा धक्का लागल्याचे लक्षात येताच त्याने जाधव यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, त्यालाही जोरदार धक्का बसला. नशीब बलवत्तर म्हणून तो जाधव यांना चिकटला नाही.