शक्तिपीठ विरोधात १२ जिल्ह्यांत महामार्ग रोखणार, १ जुलैला कृषीदिनी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:27 IST2025-06-27T13:26:28+5:302025-06-27T13:27:26+5:30
आज ठिकाण निश्चित होणार..

शक्तिपीठ विरोधात १२ जिल्ह्यांत महामार्ग रोखणार, १ जुलैला कृषीदिनी आंदोलन
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग विरोधाची धार तीव्र करण्यासाठी १ जुलैला कृषिदिनीच राज्यातील १२ जिल्ह्यात महामार्ग रोको आंदोलन करण्याचा निर्णय गुरुवारी (दि. २६) ऑनलाइन बैठकीत झाला. शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीने बैठकीचे आयोजन केले होते. काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, धारशिवचे आमदार कैलास पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह १२ जिल्ह्याचे समितीचे समन्वयक सहभागी झाले.
आमदार पाटील म्हणाले, शक्तिपीठासाठीची मोजणी हाणून पाडायची आहे. यासाठीची टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल. बारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी प्रयत्न करतो. यापुढील काळात शक्तिपीठविरोधात रस्त्यावरची लढाई व्यापक करू. पावसाळी अधिवेशनातही विरोधाची भूमिका ताकदीने मांडू.
खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात मोठ्या ताकदीने १ जुलैला महामार्ग रोकोचे आंदोलन केले जाईल. बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आपल्या परिसरात महामार्ग रोखण्याची तयारी करावी.
माजी खासदार शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आता थेट मैदानात उतरूया. मी सुरुवात केली आहे. १ जुलैच्या आंदोलनात मोठ्या संख्येेने शेतकरी सहभागी होण्यासाठी जागृत करू. सिंधुदुर्ग ते वर्धापर्यंतच्या बाधित गावात बैठका घेऊन आंदोलन यशस्वी करावे.
आमदार कदम म्हणाले, सांगली जिल्ह्यातील बाधीत गावांत बैठक घेऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जाईल. बैठकीस उद्धवसेनेचे विजय देवणे, नांदेडचे सतीश कुलकर्णी, परभणीचे गोविंद घाटोळे, बीडचे अजय बुरांडे, सांगलीचे महेश खराडे यांच्यासह बारा जिल्ह्यातील समन्वयक सहभागी झाले होते.
खासदार प्रणिता शिंदे यांना सहभाग घेण्यास सांगा..
सोलापूर जिल्ह्यातून १५६ किलोमीटर लांबीचा महामार्ग होणार आहे. याला शेतकरी तीव्र विरोध करीत आहेत. मात्र बाधित शेतकऱ्यांना राजकीय पाठबळ मिळत नाही. म्हणून खासदार प्रणिता शिंदे यांना आंदोलनाच्या पाठीशी राहण्यास सांगावे, अशी मागणी समन्वयक डॉ. सुनील दळवे यांनी केली.
आज ठिकाण निश्चित होणार..
कोल्हापूर जिल्ह्यात रास्ता रोको करण्याचे ठिकाण आज, शुक्रवारी निश्चित होणार आहे. आमदार पाटील शासकीय विश्रामगृहात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ठिकाण निवडणार आहेत.