Kolhapur: विषबाधा प्रकरणात घेतली जातेय ‘फॉरेन्सिक’ची मदत, विषाच्या प्रकारावरून घेणार संशयितांचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:45 IST2024-12-06T15:45:10+5:302024-12-06T15:45:27+5:30
सर्व शक्यतांची पडताळणी सुरू

Kolhapur: विषबाधा प्रकरणात घेतली जातेय ‘फॉरेन्सिक’ची मदत, विषाच्या प्रकारावरून घेणार संशयितांचा शोध
कोल्हापूर : मांडरे (ता. करवीर) येथील विषबाधा प्रकरणाचे गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. दोन सख्ख्या भावांचा मंगळवारी (दि. ३) उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर करवीर पोलिसांनी याचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे. मृतांच्या शरीरात कोणत्या प्रकारचे विष होते, याचा उलगडा करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली जात आहे. त्यांचा अहवाल येताच विषाच्या प्रकारावरून यातील खरी वस्तुस्थिती आणि संशयितांचा शोध घेता येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.
मांडरे येथे मुंगूस चावून दगावलेल्या कोंबडीचे मांस खाल्ल्याचे निमित्त झाले आणि वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू झाला. तिसरा मुलगा अत्यवस्थ आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पाटील पिता-पुत्रांना अन्नातून विषबाधा झाली की त्यांच्यावर कोणी विषप्रयोग केला? याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. मंगळवारी दगावलेल्या दोघांचा व्हिसेरा राखीव ठेवला आहे. त्यांच्या पोटातील काही अवयवांचे अंश तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. या तपासणीतून मृतांच्या पोटातील विषाची माहिती मिळणार आहे. विष कोणत्या प्रकारचे होते? ते किती प्रमाणात घेतले होते? कोणत्या अवयवांवर त्याचा परिणाम झाला? याची माहिती पोलिसांना मिळेल.
फॉरेन्सिकच्या अहवालानंतर पोलिसांच्या तपासाला गती येणार आहे. विषाचा प्रकार समजताच ते कोणत्या ठिकाणाहून खरेदी केले असेल? कोणी खरेदी केले असेल? याचा शोध घेण्यात पोलिसांना मदत होणार आहे. विषप्रयोग झाला नसेल तर अन्नातील कोणत्या दोषामुळे त्याचे विषात रूपांतर झाले याचाही शोध घेता येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नातेवाइकांची चौकशी
पाटील कुटुंबातील कृष्णात यांची पत्नी गंगा हिच्यावर काही ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी गंगा यांच्यासह त्यांच्या आईची चौकशी केली. मात्र, त्यांच्या चौकशीतून अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. गंगा या त्यांच्या मुलीसह माहेरी आहेत. गरज पडल्यास पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.
पोलिसांसमोर आव्हान
विषबाधेप्रकरणी करवीर पोलिसांनी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक शिंदे यांनी पोलिस ठाण्यातील सर्व अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेऊन त्यांना तपासाबद्दल सूचना दिल्या. समाजमनावर परिणाम करणारी ही घटना असल्याने दोषींना शोधून काढण्यासाठी सर्व कौशल्य पणाला लावण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.