Good news: कोल्हापुरात सर्व पोलिसांना हेल्मेट, अधिकाऱ्यांना अँड्रॉइड मोबाइल मिळणार; पोलिस अधिक्षकांची नववर्ष भेट
By उद्धव गोडसे | Updated: January 1, 2026 12:44 IST2026-01-01T12:44:03+5:302026-01-01T12:44:48+5:30
कामकाज होणार गतिमान

Good news: कोल्हापुरात सर्व पोलिसांना हेल्मेट, अधिकाऱ्यांना अँड्रॉइड मोबाइल मिळणार; पोलिस अधिक्षकांची नववर्ष भेट
उद्धव गोडसे
कोल्हापूर : नवीन वर्षात पोलिसांसाठी गुड न्यूज आहे. जिल्हा पोलिस दलातील ३३०० पोलिसांना मुख्यालयाकडून हेल्मेट दिले जाणार आहे. तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी, पोलिस ठाणी आणि शाखांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना प्रशासकीय कामांसाठी अँड्रॉइड मोबाइल दिले जाणार आहेत. यामुळे कामकाज गतिमान होईल, असा विश्वास पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी व्यक्त केला आहे.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमी रस्त्यांवर असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. अनेक पोलिस दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरत नाहीत. वरिष्ठांनी सूचना दिल्यानंतर काही दिवस याची अंमलबजावणी होते. त्यानंतर हळूहळू पुन्हा हेल्मेट घरात धूळखात पडतात. कायद्याच्या रक्षकांनी नियमित हेल्मेटचा वापर केल्यास इतर दुचाकीस्वारांना सांगणे सोयीचे ठरते. त्यामुळे आधी पोलिसांनाच हेल्मेट देण्याचा निर्णय पोलिस अधीक्षकांनी घेतला आहे. त्यानुसार जिल्हा पोलिस दलातील सर्व ३३०० पोलिसांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला हेल्मेट प्रदान केली जाणार आहेत. हेल्मेट मिळताच पोलिसांना त्याचा नियमित वापर करावा लागणार आहे.
दुसरा उपक्रम प्रभारी अधिकाऱ्यांसाठी राबवला जाणार आहे. पोलिसांचे दैनंदिन कामकाज गतिमान आणि विनाव्यत्यय होण्यासाठी पोलिस अधीक्षकांपासून ते सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना मोबाइल दिले जाणार आहेत. त्याचे सिमकार्ड आणि वार्षिक रिचार्ज मुख्यालयाकडून मिळणार आहे. अधिकारी बदलताच तो मोबाइल नवीन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द होईल. यामुळे आवश्यक मोबाइल नंबर आणि माहिती नवीन अधिकाऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. यावरच प्रशासकीय कामांचे व्हॉट्सॲप ग्रुप असतील. वरिष्ठांचे फोन, मेसेज याच नंबरवर येतील. त्यामुळे कामकाज गतिमान आणि विनाखंडित होत राहील, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
स्वत:पासून सुरुवात
हेल्मेटचा वापर करा, असे वारंवार सांगूनही दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नाहीत. कायद्याचे रक्षण करणारे पोलिसच हेल्मेट वापरत नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात होते. त्यावर उपाय म्हणून पोलिसांनी स्वत:पासून सकारात्मक बदलाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी हेल्मेटचा वापर सुरू केल्यानंतर नागरिकांनाही हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले जाणार आहे.
८० मोबाइलची खरेदी
पोलिस अधीक्षक, दोन्ही अपर पोलिस अधीक्षक, सर्व उपअधीक्षक, सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पासपोर्ट, जिल्हा विशेष शाखा, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा यासह इतर शाखांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना मोबाइल दिले जाणार आहेत. यासाठी ८० मोबाइलची खरेदी केली असून, फॅन्सी सिरियल नंबर घेतले जात आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले.