कोल्हापूर : व्यावसायिक कारणासाठी हेलिकॉप्टर घेतलं आहे; परंतु माझ्या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायातून ते मी खरेदी केले आहे. रॉयल्टी बुडवून नाही, असे स्पष्टीकरण रस्ते विकास व्यावसायिक शिवाजी पोवार (रा. टोप) यांनी दिले आहे. विधान परिषदेत बुधवारी आ. सतेज पाटील यांनी रॉयल्टीचा मुद्दा मांडताना ‘रॉयल्टी बुडवून हेलिकॉप्टर घेतले गेले’ असा उल्लेख केला होता; परंतु त्यांनी कोणाचे नाव घेतले नसताना पोवार यांनी स्वत:हून पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्टीकरण दिले आहे.पोवार म्हणाले, गेली अनेक वर्षे मी बांधकाम व्यवसायात आहे. मुंबई-गोवा आणि नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाची मी कामे करतो. माझ्या कंपन्यांची वार्षिक ५० कोटी रुपयांची उलाढाल आहे. त्यामुळे व्यावसायिक कारणासाठी मी १० कोटी रुपये कर्ज घेऊन हे हेलिकॉप्टर घेतले आहे. ते बंगळुरू येथे भाड्याने दिले आहे; परंतु आमदारांना चुकीची माहिती दिल्यानेच त्यांनी हा उल्लेख केला.
वाचा- टोपमधील ३७ विनापरवाना क्रशर सील, सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करताच 'महसूल'ची कारवाईबेकायदेशीररीत्या उत्खनन केल्याचा, रॉयल्टी बुडवल्याचा तुमच्यावर आरोप केला जात आहे. याबाबत हातकणंगले तहसील कार्यालयाकडून आपल्याला नोटीस आली होती का, अशी विचारणा केली असता पोवार यांनी मला प्रशासनाकडून कोणतीही नोटीस आतापर्यंत आलेली नाही, असे स्पष्ट केले. बाकी कुणी रॉयल्टी बुडवली आणि कोणाचे क्रशर बंद झाले, याची मला माहिती नाही. माझा क्रशर बंदच आहे, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला रंगराव भोसले, संभाजी पोवार, सुयोग पवार, सारंग नलवडे उपस्थित हाेते.
क्रशर बंद केल्याच्या रागातून तक्रारआमदार पाटील यांच्या एका कार्यकर्त्याने माझ्या घराजवळच क्रशर सुरू केला होता. या ठिकाणी आमच्या समाजाचेही लोक राहतात. त्यामुळे हा क्रशर बंद करावा, यासाठी आम्ही प्रशासनाच्या पातळीवर प्रयत्न केला होता; परंतु नंतर समझोत्याने तो सुरू करण्यात आला. कदाचित याचा राग आमदारांना असावा, असाही आरोप पोवार यांनी केला.