कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार, शहरात रिपरिप; पुढील चार दिवस राहणार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 12:12 IST2025-09-27T12:11:36+5:302025-09-27T12:12:12+5:30
सोयाबीन, भुईमूग उत्पादकांची चिंता वाढली

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार, शहरात रिपरिप; पुढील चार दिवस राहणार पाऊस
कोल्हापूर : जिल्ह्यात काल, शुक्रवारी दुपारनंतर जोरदार पावसाने सुरुवात केली, तर कोल्हापूर शहरात रिपरिप सुरू झाली. पावसाचा जोर कमी असला तरी हवेत कमालीचा गारठा जाणवत आहे. आगामी चार दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या आठ दिवस मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसाने झोडपून काढले आहे. पुराच्या पाण्याने सगळीकडे हाहाकार पसरला असताना, कोल्हापूर जिल्ह्यात मात्र उघडीप राहिली. शुक्रवार सकाळपासून वातावरणात बदल होत गेला. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहिले. आकाश गच्च असले तरी पाऊस नव्हता. दुपारी दीड वाजता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. हळूहळू पाऊस वाढत गेला आणि एक सारखी रिपरिप सुरू राहिली.
पावसाचा जोर कमी असला तरी हवेत कमालीचा गारठा जाणवत होता. त्यामुळे पाऊस जोर पकडण्याची शक्यता आहे. आगामी चार दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
जिल्ह्यात सोयाबीन व भुईमूग काढणीस आला आहे. पावसाने आता सुरुवात केली असून, आगामी काळात असाच राहिला तर काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ०.८ मिलिमीटर पाऊस झाला असला तरी गगनबावडा तालुक्यात १४.३ मिलिमीटरची नोंद झाली. धरणक्षेत्रात पाऊस कमी असल्याने विसर्ग बंद आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ दिसत नाही. पंचगंगेची पातळी १३.३ फूट असून दोन बंधारे पाण्याखाली आहेत.