Kolhapur-Gokul Dudh Sangh: अवसायानातील दूध संस्थांची सोमवारपासून सुनावणी, नव्याने नोटिसा काढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 15:54 IST2026-03-28T15:52:50+5:302026-03-28T15:54:58+5:30
सुनावणी पूर्ण होण्यासाठी महिनाभर

संग्रहित छाया
कोल्हापूर : ‘गोकुळ’शी संलग्न सभासद यादीतील ११०८ दूध संस्थांना काढलेल्या मध्यंतरी अवसायन आदेशावर सोमवार (दि. ३०)पासून सुनावणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. संबधित संस्थांना नव्याने नोटिसा काढून त्यांच्याकडून म्हणणे घेऊन सहायक निबंधक (दुग्ध) हे पात्र, अपात्र बाबतचा निर्णय घेणार आहेत. यासाठी किमान महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
‘गोकुळ’शी संलग्न दूध संस्थांचे कामकाज पोटनियमांनुसार नसल्याने दुग्ध विभागाने सुमारे १३०० संस्थांना ‘मध्यंतरी अवसायन आदेश’ काढले होते. त्यातील २०० हून अधिक संस्थांना नोटीस लागू केलेले नाही. ज्यांना नोटीस लागू केली, त्यातील दोनशे संस्थांनी आपले म्हणणे सादर केले. तोपर्यंत स्थगिती आल्याने इतर संस्थांना म्हणणे सादर करता आलेले नाही. आता सर्वच संस्थांना पुन्हा नोटीस काढून त्यांच्याकडून म्हणणे घेतले जाणार आहे.
सोमवारपासून त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. संस्थांना नोटिसा लागू केल्यानंतर दिवसाला जास्तीत जास्त ४० ते ५० संस्थांची सुनावणी लावता येणार असल्याने संपूर्ण प्रक्रियेला किमान महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
निवडणूक प्राधिकरणाला सादर केला अहवाल
मतदार यादीतील ११०८ दूध संस्थांबाबत न्यायालयाने दिलेले आदेश, त्यानंतर दुग्ध विभागाने काय भूमिका घ्यावी याबाबत सहायक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांनी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पुणे, सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्तांना अहवाल पाठवला आहे. या सगळ्या प्रक्रियेबाबत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागविले आहे.