जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 22:38 IST2025-08-19T22:36:46+5:302025-08-19T22:38:53+5:30

खोकुर्ले येथे रुग्णवाहिकेत बाळाचा जन्म आणि मृत्यू! आई होण्याचे स्वप्न भंगले

Health care system in Kolhapur is in a state of disarray, baby dies at birth, mother is being treated at CPR hospital | जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले

जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले

गगनबावडा : "बाळाचा पहिला श्वास ऐकण्याआधीच तो थांबला... आई झाल्याचा क्षण साजरा करण्याऐवजी, मी माझं लेकरू गमावलं…" बोरेबेट येथील कल्पना आनंदा डुकरे (वय ३०) हिच्या डोळ्यांतून हे शब्द निःशब्दपणे वाहत होते. मंगळवारी सकाळी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने तातडीने कोल्हापूरच्या सीपीआरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुर्दैवाने मुसळधार पावसाने गगनबावडा-कोल्हापूर मार्गच बंद असल्याने १०२ रुग्णवाहिका खोकुर्ले येथे पाणी आल्याने तिथे थांबली आणि तिथेच ही हृदयद्रावक घटना घडली. रुग्णवाहिकेतच कल्पनाची प्रसूती झाली. आई सुखरूप राहिली, पण बाळाचा जन्मानंतर काही क्षणातच मृत्यू झाल्याने आरोग्य सेवेचे मात्र धिंडवडे निघाले. 

कल्पना हिला नंतर १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरला हलविण्यात आलं, पण तिच्या डोळ्यातली पोकळी आणि थरथरणारे हात प्रत्येकाला अस्वस्थ करून गेले. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी तरळले. ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर संपूर्ण गगनबावड्याच्या आरोग्य व्यवस्थेची करुण कहाणी आहे. डोंगराळ तालुक्यात प्रत्येक पावसाळा हा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

Web Title: Health care system in Kolhapur is in a state of disarray, baby dies at birth, mother is being treated at CPR hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.