Gokul Milk : 'गोकुळ'मधील पेच सुटला; अध्यक्षपदी हसन मुश्रीफांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:08 IST2025-05-30T16:06:47+5:302025-05-30T16:08:08+5:30
Gokul Milk : नविद मुश्रीफ यांच्या नावाला अंतर्गत विरोध करण्यात आला होता. पण आता अध्यक्षपदासाठी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

Gokul Milk : 'गोकुळ'मधील पेच सुटला; अध्यक्षपदी हसन मुश्रीफांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची निवड
Gokul Milk : मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे पेच निर्माण झाला होता. दरम्यान, आता गोकुळच्या अध्यक्षपदाचा पेच सुटला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ संचालक नाविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बिहारमध्ये आश्रय मिळेना म्हणून दिल्लीत थाटला संसार; ३८ बांगलादेशी घुसखोर पोलिसांच्या ताब्यात
नाविद मुश्रीफ यांच्या नावाला अंतर्गत विरोध करण्यात आला होता. पण आता अध्यक्षपदासाठी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. काही दिवसांपासून गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण, मधल्या काळात झालेल्या राजकीय हालचालींमुळे आता मुश्रीफ यांचे नाव समोर आले. गुरुवारी जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनामध्ये अडीच तास बैठक झाली. या बैठकीमध्ये नेत्यांनी चर्चा करत यामध्ये नाव ठरवत बंद लिफाफ्यातून ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे ते नाव सुपूर्द केले होते.तो लिफाफा आज खोलण्यात आला. यानंतर नाविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
वरिष्ठ नेत्यांचा हस्तक्षेप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप आल्यानंतरच राजीनामा देऊ, अशी भूमिका अरुण डोंगळे यांनी घेतली होती. तर, मंगळवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून वस्तुस्थिती सांगू व डोंगळेंसह सगळ्यांना मान्य होईल असा अध्यक्षपदाचा चेहरा ठरवल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितल्याने ‘तो’ चेहरा कोण? याविषयी उत्सुकता लागली होती. महायुती म्हणून अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अजित नरके, नविद मुश्रीफ, प्रा. किसन चौगले यांच्या नावाची चर्चा होती. विश्वास पाटील हे इच्छुक नाहीत, तर ‘नाविद’ अध्यक्ष होणार नाही, हे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले होते.