Kolhapur Politics: 'गोकुळ'मध्ये मुश्रीफ, सतेज, आबिटकर, कोरे यांची एकी; डोंगळे एकाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:30 IST2025-05-16T11:29:17+5:302025-05-16T11:30:06+5:30

गोकुळचे राजकारण तापले : शाहू आघाडीचे सर्व १७ संचालक एकत्र

Hasan Mushrif Satej Patil Prakash Abitkar Vinay Kore are united in Gokul Dudh Sangh politics Arun Dongle is alone | Kolhapur Politics: 'गोकुळ'मध्ये मुश्रीफ, सतेज, आबिटकर, कोरे यांची एकी; डोंगळे एकाकी

छाया-आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गुरूवारी ताराबाई पार्कातील कार्यालयात सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे सर्व १७ संचालक व दोघे स्वीकृत एकत्र येऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे आघाडीतील डोंगळे एकाकी पडले. मुदत संपली असताना त्यांनी मासिक बैठकीत राजीनामा दिला नाही. बैठकीस गैरहजर राहणे पसंत केले. 

आदेश देऊनही त्यांनी राजीनामा न दिल्याने आघाडीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांना धक्का बसला. महायुतीचे कार्ड पुढे करत ते अध्यक्षपदावरून पायउतार न झाल्याने मंत्री मुश्रीफ, आमदार पाटील यांच्या पुढील आदेशानुसार घडामोडी होणार आहेत. महायुतीचे राज्यस्तरीय नेते व डोंगळे काय करतात यावर पुढील राजकारण अवलंबून असेल.

चार वर्षांपूर्वी गोकुळची निवडणूक मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, विनय कोरे, संजय मंडलिक, चंद्रदीप नरके, आदींनी एकत्र येऊन शाहू विकास आघाडी म्हणून लढवली. विरोधातील माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार दिवंगत पी. एन. पाटील यांच्याकडून आघाडीने सत्ता काढून घेतली. त्यानंतर विश्वास पाटील यांनी दोन वर्षे अध्यक्षपद भूषवल्यानंतर नेत्यांच्या आदेशानुसार राजीनामा दिला. अरूण डोंगळे अध्यक्ष झाले. त्यांची दोन वर्षांची मुदत संपल्यामुळे गुरुवारच्या मासिक बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश आघाडीचे नेते मुश्रीफ, आमदार पाटील यांनी दिले होते.

वाचा-  डोंगळेंनी तत्काळ राजीनामा द्यावा, मंत्री हसन मुश्रीफ यांनी बजावले

दरम्यान, महायुतीचाच अध्यक्ष व्हावा, अशी भूमिका घेत डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार देत नेत्यांच्या आदेशाविरोधात बंड केले. मात्र, डोंगळे यांच्या भूमिकेला समर्थन न देता महायुतीशीसंंबंधित संचालकांनीही शाहू आघाडी म्हणून एकसंघ राहण्याचा उघड निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे आघाडीची बैठकही झाली. बैठकीत यापुढील काळातही एकसंघपणे राहण्यासाठी निर्धार केला. दुपारनंतर गोकुळ शिरगाव येथील मुख्य कार्यालयात ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठक झाली. बैठकीस शाहू आघाडीसह विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक, चेतन नरके, बाळासाहेब खाडे हेही उपस्थित राहिले.

या १७ संचालकांची एकीची मूठ

आघाडीचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रा.किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, एस.आर. पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, अंबरिशसिंह घाटगे, बयाजी शेळके, अंजना रेडेकर हे निवडून आलेले व युवराज पाटील, राजेंद्र मोरे हे स्वीकृत संचालक एकसंघपणे ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्कातील कार्यालयात उपस्थित राहिले.

वाचा- मंत्री मुश्रीफ यांनी फोन हातात घेतला, 'गोकुळ'च्या राजकारणाची चक्रे फिरली..

नवीन अध्यक्ष निवडीसारखी उत्सुकता..

डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीमाना देण्यास नकार दिला तरी ताराबाई पार्कातील कार्यालयात नवीन अध्यक्ष निवडीसारखे वातावरण काही काळ निर्माण झाले होते. आमदार सतेज पाटील, मंत्री मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते आणि शाहू आघाडीच्या संचालकांचे समर्थक सकाळी ११ पासून येत राहिले. आघाडीचे सर्व संचालक एकत्र येऊन पार्टी बैठक घेऊन मुख्य कार्यालयात मासिक बैठक घेतली.

महायुतीचाच अध्यक्ष व्हावा : डोंगळे

वैयक्तिक कारणासाठी संचालक मंडळ बैठकीला रजा कळवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसारच अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही. मी अध्यक्षपदासाठी आग्रह नाही मात्र होणारा नवीन अध्यक्ष महायुतीचाच असावा, अशी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांची इच्छा आहे, अशी माहिती अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.

ते म्हणाले, राजीनामा दिला नाही तर संचालक मंडळ बैठकीत माझ्यावर अविश्वास ठराव आणल्यास त्याबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. ‘गोकुळ’मध्ये आजपर्यंत राज्यातील वरिष्ठ नेत्यांचा अदृश्य सहभाग होता. आता तो उघडपणे आहे इतकाच फरक आहे. राज्य सरकारच्या मदतीशिवाय गोकुळसारख्या मोठ्या संस्थेमध्ये काही करता येत नाही. सरकारच्या विरोधात गेल्यास ‘गोकुळ’ला अडचणी येऊ शकतात म्हणूनच मी महायुतीच्या नेत्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले आहे.

डोंगळे राजीनामा देण्याची शक्यता

सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, अजित नरके, नंदकुमार ढेंगे यांची चर्चा झाली. त्यामध्ये डोंगळे यांनी राजीनामा द्यावा असे ठरल्याचे समजते. महायुतीचाच अध्यक्ष करायचा निर्णय झाल्यास या पदासाठी अजित नरके यांचे नाव पुढे आले आहे.

शाहू आघाडी म्हणून आम्ही एकसंघ आहोत. आघाडीत सर्व पक्षाचे संचालक आहेत. आघाडीचे नेते सांगतील त्याप्रमाणे अध्यक्षपदासंबंधाची पुढील भूमिका राहील. मासिक बैठकीत अध्यक्ष बदलासंबंधी कोणतीही चर्चा झाली नाही. अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी वैयक्तिक कारणासाठी रजेवर असल्याने कळविले आहे. अध्यक्षकाळात मासिक बैठकीला गैरहजर राहण्याची दुसरी वेळ आहे. मासिक बैठकीस शौमिका महाडिक यांच्यासह विरोधी आघाडीचे संचालक उपस्थित होते. मुरलीधर जाधव हे त्यांच्या घरगुती कारणामुळे उपस्थित राहिले नाहीत. - विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक, गोकुळ

Web Title: Hasan Mushrif Satej Patil Prakash Abitkar Vinay Kore are united in Gokul Dudh Sangh politics Arun Dongle is alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.