Kolhapur: हुंड्यासाठी छळ, प्राध्यापिकेने संपवले जीवन; पतीसह चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 13:46 IST2024-09-12T13:45:31+5:302024-09-12T13:46:46+5:30
कोडोली : कारखाना खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याकरिता वारंवार छळ केल्याने प्रियांका रणजित पाटील (वय ३१ रा. बाबूपार्क बहिरेवाडी ...

Kolhapur: हुंड्यासाठी छळ, प्राध्यापिकेने संपवले जीवन; पतीसह चौघांना अटक
कोडोली : कारखाना खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याकरिता वारंवार छळ केल्याने प्रियांका रणजित पाटील (वय ३१ रा. बाबूपार्क बहिरेवाडी ता. पन्हाळा) या महिलेने मंगळवारी राहत्या घरात बेडरूममधील फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांवर कोडोली पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. याबाबतची फिर्याद प्रियांकाचे वडील सुनील वसंतराव पवार, (रा. अहिल्यानगर, कुंडल, ता. पलुस, जि. सांगली) यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कुंडल येथील सुनील पवार यांची मुलगी प्रियांका हिचा विवाह बहिरेवाडी येथील रणजित सुभाष पाटील यांच्याशी २०१७ मध्ये झाला होता. सासरची मंडळी प्रियांकाला माहेरहून कारखाना खरेदीसाठी पैसे आणण्याची वारंवार मागणी करत होते. तिने माहेरून पाच लाख रुपये आणले होते. परंतु, अजून पाच लाख रुपये घेऊन यावे, असा तगादा सासरच्या लोकांनी लावला होता. तिने पैसे आणण्यास नकार दिल्याने शिवीगाळ, मारहाण करून त्रास दिला जात होता. सासरच्या मंडळींच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रियांकाने मंगळवारी आत्महत्या केली.
या घटनेची माहिती कुंडल येथील माहेरच्या नातेवाइकांना समजताच त्यांनी कोडोली पोलिसात पती, सासू, सासरे, नणंद, दीर, जाऊ या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याबाबत आग्रह धरला. गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी रात्री उशिरा पती रणजित सुभाष पाटील, सासरे सुभाष हिंदूराव पाटील, सासू शोभा पाटील, दीर विशाल पाटील, जाऊ प्रज्ञा पाटील व नणंद शीतल चव्हाण या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पती, सासू, दीर व जाऊ यांना कोडोली पोलिसांनी अटक केली. पुढील तपास कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग करीत आहेत.