विद्यार्थ्यांची चंगळ; कोल्हापुरात परीक्षेच्या तीन तासांआधीच सहामाहीचे पेपर युट्यूबवर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 12:33 PM2023-11-03T12:33:08+5:302023-11-03T12:33:56+5:30

मुख्याध्यापक संघाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

half term paper on YouTube three hours before exam in Kolhapur | विद्यार्थ्यांची चंगळ; कोल्हापुरात परीक्षेच्या तीन तासांआधीच सहामाहीचे पेपर युट्यूबवर!

विद्यार्थ्यांची चंगळ; कोल्हापुरात परीक्षेच्या तीन तासांआधीच सहामाहीचे पेपर युट्यूबवर!

कोल्हापूर : एकीकडे स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे म्हणून शिक्षण विभाग प्रयत्न करत असला तरी दुसरीकडे मात्र आठवी ते दहावीच्या सहामाही परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना तीन तास आधीच थेट प्रश्नपत्रिकाच एका यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळत असल्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात उघड झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करण्याऐवजी हे यूट्यूब चॅनेल पाहूनच परीक्षेला जात आहेत. यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील आंधळा कारभार चव्हाट्यावर आला आहे. सध्या पाचवी ते दहावीपर्यंतची सहामाही परीक्षा सुरू आहे.

जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने सहामाही परीक्षेला २७ ऑक्टोबरला सुरुवात झाली असून, ६ नोव्हेंबरला संपणार आहेत. यातील आठवी ते दहावीतील परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तब्बल तीन तास आधीच विद्यार्थ्यांना एका यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळत आहेत. या चॅनेलबाबत काही शिक्षक, मुख्याध्यापक या सर्वांना माहीत आहे. मात्र, ते याकडे कानाडोळा करत असल्याने विद्यार्थ्यांची 'परीक्षा' बिनबोभाट होत आहे. मात्र, यामुळे परीक्षा घेण्याचा मूळ उद्देशच बाजूला पडत असल्याचे चित्र आहे.

मुख्याध्यापक संघाला हे माहीत नाही?

पाचवी ते दहावीच्या सहामाही परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मुख्याध्यापक संघ काढते. त्याची गोपनीयता ठेवली जात असल्याचा दावा संघाकडून केला जातो. मात्र, असे असूनही या प्रश्नपत्रिका फुटतात कशा, असा प्रश्न आहे. केवळ विद्यार्थ्यांना पास करण्यासाठीच मुख्याध्यापक संघाकडून या परीक्षा घेतल्या जात आहेत का? असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

तीन वर्षांपासून मिळतात प्रश्नपत्रिका

आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून यूट्यूब चॅनेलवर प्रश्नपत्रिका मिळत असल्याचे एका पालकाने सांगितले. या तीन वर्षांत मुख्याध्यापक संघाला प्रश्नपत्रिका फुटत असल्याचे कळाले कसे नाही? हा प्रश्न आहे. एका गुणवंत विद्यार्थ्याने याबाबत एका शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांकडे याबाबत तक्रार केली. मात्र, त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रश्नपत्रिका काढण्यापासून ते शाळास्तरापर्यंत ही साखळी असल्याचा संशय आहे.

सकाळी आठलाच प्रश्नपत्रिका कळते

संबंधित यूट्यूब चॅनेलवर सकाळी आठ वाजताच प्रश्नपत्रिका दाखविली जाते. ज्या विद्यार्थ्यांना या यूट्यूबबद्दल माहिती आहे ते विद्यार्थी सकाळी आठपासूनच यूट्यूबर प्रश्नपत्रिका पाहत बसतात. जे प्रश्न आहेत त्यानुसार उत्तरांचे पाठांतर करतात. आठवी व नववीमध्ये सहामाही परीक्षेचे गुण अंतिम गुणांकनात ग्राह्य धरले जातात. सहामाही परीक्षेचा कारभार अशा प्रकारे चालत असल्याने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.

मुख्याध्यापक संघामध्ये पाचवी ते दहावीच्या सत्र परीक्षा, पूर्व परीक्षा निर्मिती करून छपाईचे काम केले जाते. परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच घ्याव्यात अशा सक्त सूचना शाळांना दिलेल्या आहेत. वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यापूर्वी नॅचरल होमवर्क २०२३ या यूट्यूब चॅनेलवर मुख्याध्यापक संघाच्या प्रश्नपत्रिका व्हायरल केल्या आहेत. व्हायरल करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख, सायबर व शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रश्नपत्रिकाचेे वितरण संघाने शाळांना केल्यानंतर या प्रश्नपत्रिकेची जबाबदारी मुख्याध्यापक व परीक्षा प्रमुखांची आहे. - अजित रणदिवे सहसचिव मुख्याध्यापक संघ

Web Title: half term paper on YouTube three hours before exam in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.