Kolhapur: म्हाकवेतील आजी-नातीचा ट्रकने ठोकरल्याने जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 15:11 IST2024-04-29T15:10:47+5:302024-04-29T15:11:35+5:30
देवकार्याचा कार्यक्रम असल्यामुळे गावाकडे येताना काळाचा घाला

Kolhapur: म्हाकवेतील आजी-नातीचा ट्रकने ठोकरल्याने जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
म्हाकवे : पुणे येथे नावले ब्रिजवर बसची वाट पाहत थांबलेल्या आजी व नातीला भरधाव ट्रकने ठोकरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगल सिद्राम पाटील (वय ४०, रा. म्हाकवे), असे आजीचे तर परी सुरेश शेटके (६, रा. हदनाळ, ता. निपाणी), असे नातीचे नाव आहे. अपघाताचे वृत्त समजताच म्हाकवे, हदनाळ गावांवर शोककळा पसरली आहे. घटनेची नोंद पुणे पोलिसांत झाली आहे.
म्हाकवे येथील सिद्राम तुकाराम पाटील हे अनेक वर्षांपासून पत्नी व मुलासह पुणे येथे वास्तव्यास आहेत. शनिवारी सायंकाळी त्यांच्या पत्नी मंगल पाटील व नात परी या दोघी हदनाळ येथे देवकार्याचा कार्यक्रम असल्यामुळे गावाकडे येत होत्या. रात्री दहा ते अकराच्या सुमारास नावले ब्रिजजवळ त्या बसची वाट पाहत होत्या. यावेळी ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. संबंधित ट्रक चालकाला पुणे येथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
..आनंदी वातावरणाचे रूपांतर शोकसागरात
म्हाकवे, हदनाळ पंचक्रोशीत देव दारात आणून वालंग घालणे. देवाचा हा सोहळा त्या कुटुंबाला एक आनंदाचा क्षण आणि समाधानाची पर्वणीच देणारा असतो. या सोहळ्याचा क्षण काही तासांवर आला होता. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली होती. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आजी- नातही येत होत्या. मात्र, त्या येण्याअगोदरच त्यांच्या अपघाताचे वृत्त समजताच सर्व कुटुंबासह नातेवाईक शोकसागरात बुडाले.