कोल्हापुरात शासकीय अधिकारी शुक्रवारी येणार चालत, सायकलने; कारण काय.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 18:40 IST2025-10-08T18:39:54+5:302025-10-08T18:40:59+5:30
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

संग्रहित छाया
कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वाहतूक व ऊर्जा बचतीसाठी शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर रोजी ‘ग्रीन डे आणि अर्थ मिनिट’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या दिवशी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी हे सायकलने, चालत किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने कार्यालयात येतील. पर्याय नसेल तर एका गाडीतून अनेक जण येतील.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे उपस्थित होते.
हा उपक्रम कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था, शहरी, तसेच ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा समन्वय जिल्हा साथरोग नियंत्रण कक्षाकडून करण्यात येत असून, बैठकीला डॉ. संतोष रेवडेकर, डॉ. संतोष तवशी, अल्ताफ शेख, प्रवीण मुळीक उपस्थित होते.
या दिवशी हे करायचे
- कार्यालयीन व वैयक्तिक प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहन, सायकल, पायी प्रवास, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे
- पाच कि.मी. अंतरातील अधिकारी व कर्मचारी यांनी सायकल / पायी प्रवास करावा.
- लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करावा
- अनावश्यक मोबाइल वापर कमी करून दिवसातील स्क्रीन टाइम २ तासांपेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
- एसी, पंखे, वीज उपकरणे आवश्यकतेनुसारच वापरावीत.
रात्री आठ वाजता उपकरणे बंद
शुक्रवारी रात्री आठ वाजता ‘अर्थ मिनिट’ या उपक्रमामध्ये दहा मिनिटे विजेची सर्व उपकरणे बंद करून ऊर्जा बचतीमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.