शासकीय कर्मचाऱ्यांची 'दिवाळी'च; कोल्हापुरात सलग सहा दिवस कार्यालये राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:59 IST2025-10-17T16:54:31+5:302025-10-17T16:59:42+5:30
२७ पासून नियमित कामकाज

संग्रहित छाया
कोल्हापूर : शनिवार-रविवार.. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली स्थानिक सुटी, दिवाळीचे तीन दिवस असे मिळून सलग सहा दिवस सर्व शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. पुढच्या शुक्रवारी (दि. २४) एक दिवस कार्यालय सुरू राहणार आहे, त्यातही कुणी रजा टाकलीच तर सलग दहा दिवसांनंतरच त्यांचे कार्यालयात आगमन होणार आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात काम असणाऱ्यांनी पुढील आठवडाभर तिथे न फिरलेलेच बरे..
दिवाळी या वर्षातील सर्वात मोठ्या सणाला सगळ्यांनाच सुटी हवी असते. सणातील धार्मिक विधी, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, गावी जाणे-येणे असा सगळीकडे आनंदी आनंद असतो. शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हा आनंद यंदा द्विगुणित करणारा आहे. शुक्रवारचा एक दिवस कार्यालय सुरू आहे. शनिवार व रविवारी नियमित सुटी आहे.
सोमवारी दिवाळीचा पहिला दिवस असून, त्यादिवशी नरकचतुर्दशी आहे. या दिवशी शासकीय सुटी नसते; पण जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक सुटी जाहीर केली आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, असे तीन दिवस शासनाने दिवाळीची सुटी जाहीर केली आहे. त्यानंतर फक्त शुक्रवारचा एक दिवस मध्ये येतो. त्यानंतर पुन्हा शनिवार-रविवारी सुटी आहे. शुक्रवारी एक दिवस कुणी रजा टाकली तर तब्बल दहा दिवसांनीच ते कामावर रुजू होणार आहेत.
एवढ्या सुट्या बघता नागरिकांनी हे वेळापत्रक बघूनच शासकीय कार्यालयाची पायरी चढणे गरजेचे आहे. अन्यथा विनाकारण हेलपाटा होण्याचीच शक्यता जास्त आहे. सोमवार (दि. २७) पासूनच शासकीय कार्यालये नियमितपणे सुरू होतील.