राज्यात आता ठाकरे सरकार देणार "राजीव गांधी तंत्रज्ञान पुरस्कार"; सतेज पाटील यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 10:09 PM2021-08-10T22:09:37+5:302021-08-10T22:13:12+5:30

दरवर्षी राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी म्हणजे २० ऑगस्टला हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा माहीती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली.

The Government of Maharashtra will now present the Rajiv Gandhi Technology Award for Outstanding Achievement in Technology | राज्यात आता ठाकरे सरकार देणार "राजीव गांधी तंत्रज्ञान पुरस्कार"; सतेज पाटील यांची घोषणा

राज्यात आता ठाकरे सरकार देणार "राजीव गांधी तंत्रज्ञान पुरस्कार"; सतेज पाटील यांची घोषणा

googlenewsNext

कोल्हापूर : केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्काराला असलेले माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचे नाव बदलून हॉकीतील जादूगार मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले, त्यावरून वादप्रतिवाद सुरू असताना राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दरवर्षी राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी म्हणजे २० ऑगस्टला हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा माहीती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली.

राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय लगेच जारी केला असला तरी हा निर्णय ७ जुलै २०२१ रोजी माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री सतेज पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर आधुनिकीकरणाचा केंद्र बिंदू आहे. राजीव गांधी यांनी माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार व परिणामकारक वापर करण्यावर भर दिला होता. म्हणून त्यांच्या स्मृतीदिनी या क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन समाजाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देण्यात यावा, असा निर्णय बैठकीत झाल्याचे म्हटले आहे.

आता राज्य सरकारतर्फे हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या विभागावर आर्थिक भार पडणार नाही, अशा पद्धतीचा हा पुरस्कार असावा, असेही म्हटले आहे. या पुरस्काराची निवड आणि नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यावर्षी २० ऑगस्ट रोजी या पुरस्काराची घोषणा करावी. त्यासाठीची निवड प्रक्रिया सुरू करून ३० ऑक्टोबर पूर्वी निकष ठरविणे, निवड करणे वगैरे प्रक्रिया पार पाडून पुरस्कार देण्यात यावा. यापुढे दरवर्षी २० ऑगस्ट या राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनीच हा पुरस्कार देण्यात यावा, असे राज्यमंत्री सतेज पाटील यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

Web Title: The Government of Maharashtra will now present the Rajiv Gandhi Technology Award for Outstanding Achievement in Technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.