कोल्हापुरात १९ ते २४ मिनिटांत घटनास्थळी पोहोचतात शासकीय रुग्णवाहिका; सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील स्थिती काय.. जाणून घ्या
By समीर देशपांडे | Updated: October 10, 2025 12:38 IST2025-10-10T12:34:39+5:302025-10-10T12:38:22+5:30
या रुग्णवाहिका १० मिनिटांत कशा पोहोचतील यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन सुरू

कोल्हापुरात १९ ते २४ मिनिटांत घटनास्थळी पोहोचतात शासकीय रुग्णवाहिका; सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील स्थिती काय.. जाणून घ्या
समीर देशपांडे
कोल्हापूर : प्रसूती, अपघात, अचानक हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना शासनाच्या १०२ आणि १०८ रुग्णवाहिकांचा मोठा आधार आहे. परंतु अजूनही या रुग्णवाहिका तातडीने पोहोचण्यात कमी पडत असल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागानेच काढला आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांपैकी सांगली जिल्ह्यातील रुग्णवाहिका सर्वात उशिरा घटनास्थळी पोहोचत असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
या चार जिल्ह्यांमध्ये १०८ रुग्णवाहिकांचा प्रतिसाद वेळ किती आहे याची माहिती घेतली असता सांगली जिल्ह्यातील ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट असलेली रुग्णवाहिका सरासरी ३१ मिनिटे ४७ सेकंदांनी पोहोचते, तर बेसिक लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका २९ मिनिटे १२ सेकंदांनी पोहोचते. रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णवाहिका अनुक्रमे १६ मिनिटे २६ सेकंद आणि १८ मिनिटे २९ सेकंदांनी पोहोचत असल्याचे दिसून आले. या रुग्णवाहिका १० मिनिटांत कशा पोहोचतील यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन सुरू आहे.
या दोन्ही प्रकारच्या रुग्णवाहिका फक्त आरोग्य संस्थेत होणाऱ्या प्रसूतीसाठीच अधिकाधिक वापरात येत असल्याचे दिसून आले आहे. प्रसूतीसाठी महिलांना आणणे आणि पुन्हा घरी सोडणे यासाठीही १०२ रुग्णवाहिकांचा वापर कमी होत आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका सेवा गरोदर महिला, प्रसूतिका, नवजात बालक व बालके यांच्यासाठी तसेच सर्व वैद्यकीय संदर्भ सेवा देण्यासाठी वापरण्यात यावी अशाही सूचना नव्याने देण्यात आल्या आहेत.
जिल्हा ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट प्रतिसाद वेळ - बेसिक लाइफ सपोर्ट प्रतिसाद वेळ
- सांगली - ३१ मिनिटे ४७ सेंकद - २९ सेकंद १२ मिनिटे
- कोल्हापूर - १८ मिनिटे ५५ सेकंद - २४ मिनिटे ७ सेकंद
- रत्नागिरी - १६ मिनिटे २६ सेकंद - १८ मिनिटे २९ सेकंद
- सिंधुदुर्ग - १४ मिनिटे ३३ सेकंद - २३ मिनिटे १५ सेकंद
जिल्हा - १०२ रुग्णवाहिका संख्या - १०८ रुग्णवाहिका संख्या
- कोल्हापूर - ९८ / ३६
- सांगली - ९८ / २४
- रत्नागिरी - ९४ / १७
- सिंधुदुर्ग - ४९ / १२
- एकूण - ३३९ / ८९