Kolhapur: घरे गहाण ठेवून शिरोली येथील गोपाळ समाजाने उभारले २१ लाखांचे मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 19:21 IST2026-02-20T19:21:09+5:302026-02-20T19:21:54+5:30

समाजासाठी हक्काचे मंदिर नसल्याची होती खंत

Gopal community in Shiroli Kolhapur built a temple worth 21 lakhs by mortgaging their houses | Kolhapur: घरे गहाण ठेवून शिरोली येथील गोपाळ समाजाने उभारले २१ लाखांचे मंदिर

Kolhapur: घरे गहाण ठेवून शिरोली येथील गोपाळ समाजाने उभारले २१ लाखांचे मंदिर

सतीश पाटील

शिरोली : राहती घरे गहाण ठेवून शिरोली येथील गोपाळ समाजाने २१ लाखांचे कुलदैवत आई काळुबाईचे मंदिर उभारले आहे. या मंदिराच्या कलश आणि मूर्ती प्रतिष्ठापना आज, शुक्रवारी होणार आहे.

हातकणंगले तालुक्यातील शिरोली माळवाडीवरील पारंपरिक बँजो (वाजंत्री) व्यवसाय करणाऱ्या भटक्या गोपाळ समाजाने अद्वितीय जिद्द व एकजुटीचे दर्शन घडवत आपल्या कुलदैवत आई काळुबाईचे भव्य मंदिर स्वकष्टाने उभारले आहे. हे मंदिर समाजाच्या श्रद्धेइतकेच स्वाभिमानाचे प्रतीक ठरत आहे.

या मंदिरासाठी शिरोलीतील एका पतसंस्थेकडून १५ लाख रुपये कर्ज घेतले असून, उर्वरित रक्कम वस्तीतील प्रत्येक व्यक्तीकडून एक हजार रुपयांची वर्गणी गोळा करून उभारण्यात आली. या मंदिराचा कळस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी वाजत गाजत आणला असून, आज शुक्रवारी आई काळुबाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

माळवाडीतील या गोपाळ वस्तीत सुमारे ४७० लोक कुटुंबासह राहतात. गावातील इतर समाजांच्या वस्त्यांमध्ये मंदिरे असल्याने धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होतात; मात्र आपल्या समाजासाठी हक्काचे मंदिर नसल्याची खंत या समाजाला होती. त्यामुळे सर्वांनी एकत्र येत स्वतःची राहती घरे पतसंस्थेकडे तारण ठेवून मंदिर उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला.

समाजातील आकाश पवार, लखन जाधव, अमित जाधव, किरण जाधव, पिंटू जाधव व सिकंदर जाधव या तरुणांनी पुढाकार घेत आपली घरे गहाण ठेवून निधी उभारण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. हातावर पोट असलेल्या या समाजासाठी हा निर्णय अत्यंत कठीण असला तरी त्यांनी समाजाच्या एकतेसाठी त्याग केला.

Web Title : कोल्हापुर: गोपाल समाज ने घर गिरवी रखकर बनाया 21 लाख का मंदिर

Web Summary : शिरोली के गोपाल समाज ने घर गिरवी रखकर कुलदेवी कालुबाई का 21 लाख का मंदिर बनाया। उन्होंने ऋण लिया और दान एकत्र किया, जो एकता और भक्ति का प्रदर्शन है।

Web Title : Kolhapur Gopal community builds temple worth 2.1 million by mortgaging homes.

Web Summary : The Gopal community in Shiroli built a 2.1 million temple for their deity Kalubai by mortgaging their homes. They took a loan and collected donations, showcasing unity and devotion.