Kolhapur: ‘गोकुळ’ नव्या अध्यक्षाची निवड ३० किंवा ३१ मे रोजी, अरुण डोंगळेंचा राजीनामा एकमताने मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:01 IST2025-05-23T12:01:04+5:302025-05-23T12:01:33+5:30
कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे ( गोकुळ ) अध्यक्ष ...

Kolhapur: ‘गोकुळ’ नव्या अध्यक्षाची निवड ३० किंवा ३१ मे रोजी, अरुण डोंगळेंचा राजीनामा एकमताने मंजूर
कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा गुरुवारी संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. नवीन अध्यक्ष निवडीसाठी ३० किंवा ३१ मे या दिवशी संचालक मंडळाची सभा बोलविली जाण्याची शक्यता आहे.
डोंगळे यांच्या राजीनाम्यामुळे गोकुळच्याराजकारणाचे तापलेले दूध थंड झाले असले तरी आता नवा अध्यक्ष कोण याची उत्सुकता जिल्ह्यातील दूध उत्पादकांना लागली आहे. सहकार प्राधिकारणाकडे नवीन अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
दोन वर्षांची अध्यक्षपदाची टर्म पूर्ण केलेल्या डोंगळे यांनी पुढचा अध्यक्ष महायुतीचाच व्हावा अशी अट घालत राजीनामा देण्यास नकार दिला होता. यामुळे गोकुळच्या राजकारणात ट्विस्ट निर्माण झाले होते. मात्र, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर मंगळवारी डोंगळे यांनी आपला राजीनामा संघाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश गोडबोले यांच्याकडे दिला. गोडबोले यांनी तो मंजुरीसाठी संचालकांच्या बैठकीत ठेवला. या बैठकीत या राजीनाम्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
राजीनामा विभागीय उपनिबंधकांकडे पाठवला
डोंगळे यांचा मंजूर केलेला राजीनामा गोडबोले यांनी पुणे विभागीय उपनिबंधक यांच्याकडे गुरुवारीच पाठवला. उपनिबंधकांकडून तो सहकार प्राधिकरणाकडे पाठवला जाईल. त्यानंतर त्यांच्याकडून नव्या अध्यक्ष निवड प्रक्रियेची तारीख जाहीर केली जाणार आहे.
अंबरिष घाटगे, नाविद मुश्रीफ गैरहजर
गोकुळ संचालकांच्या बैठकीत २१ पैकी २ संचालक गैरहजर होते. अंबरिष घाटगे व नाविद मुश्रीफ हे बाहेरगावी असल्याने या बैठकीला उपस्थित नव्हते. उर्वरित सर्व संचालकांनी बैठकीला उपस्थिती दर्शविली.
डोंगळे यांच्याकडेच प्रभारी कार्यभार
नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत डोंगळे यांच्याकडेच प्रभारी अध्यक्ष म्हणून कार्यभार राहणार आहे. संघाच्या पोटनियमांमध्येच तशी तरतूद आहे. मात्र, या काळात त्यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही.
नेत्यांनी दोन वर्षाची अध्यक्षपदाची संधी दिली, त्या संधीची मी सोने केले याचा अभिमान आहे. गोकुळच्या इतिहासात सर्वाधिक नफा माझ्या काळात मिळवून देता आला. हे यश माझ्या एकट्यामुळे नसून सर्वांच्या साथीमुळे मिळवता आले. -अरुण डोंगळे, संचालक, गोकुळ दूध संघ.