ड्रग्ज विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा; मुंबईतील महिलेसह गोव्यातील विक्रेता जेरबंद, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:02 IST2025-02-20T12:02:17+5:302025-02-20T12:02:37+5:30
परेरा-गवई लिव्ह इनमध्ये, २४ ग्रॅम ड्रग्ज, दोन किलो गांजा जप्त

ड्रग्ज विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा; मुंबईतील महिलेसह गोव्यातील विक्रेता जेरबंद, तिघांना अटक
कोल्हापूर : जुना राजवाडा पोलिसांनी ७ फेब्रुवारीला फुलेवाडी येथून पकडलेल्या ड्रग्ज विक्रेत्याच्या तपासातून आंतरराज्यीय टोळीचा छडा लावला. नवी मुंबईत तळोजा येथे लपलेले अनिल संतराम नंदीवाले (वय ३१, रा. माळवाडी, दोनवडे, ता. करवीर) याच्यासह मुंबईतील विक्रेती मनिषा महेंद्र गवई (२५) आणि गोव्यातील ड्रग्ज पुरवठादार एडमंड दिलीप स्पेन्सर परेरा (५४, दोघे सध्या रा. तळोजा, नवी मुंबई) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २४ ग्रॅम ड्रग्ज, दोन किलो गांजा, दोन दुचाकी आणि एक कार असा सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
फुलेवाडी रिंगरोड येथे सापळा रचून पोलिसांनी ड्रग्ज विक्रेता रोहित बसूराज व्हसमणी (२४, रा. माळवाडी, दोनवडे) याला अटक केली होती. त्याच्याकडून दोन ग्रॅम ड्रग्ज आणि दीड किलो गांजा जप्त करून अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू होता. त्याने दोनवडे येथील अनिल नंदीवाले याच्याकडून अंमली पदार्थ खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो गोव्यात लपल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांचे पथक गोव्यात पोहोचण्यापूर्वीच नंदीवाले हा अन्य दोन साथीदारांसह मुंबईत पोहोचला. ते तळोजा येथील एका अपार्टमेंटमध्ये असल्याची खात्री पटताच पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली.
त्यांच्याकडे २२ ग्रॅम ड्रग्ज आणि अर्धा किलो गांजा मिळाला. या टोळीने कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री केल्याचा संशय आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने कारवाई केली.
विक्रीची साखळी उद्ध्वस्त
रोहित व्हसमणी हा त्याच्या गावातील अनिल नंदीवाले याच्याकडून गांजा आणि ड्रग्ज खरेदी करत होता. नंदीवाले हा मुंबईतील मनिषा गवई या तरुणीकडून खरेदी करत होता तर मनिषा ही गोव्यातील परेरा याच्याकडून अंमली पदार्थांची खरेदी करत होती. पोलिसांनी विक्रीची साखळी उद्ध्वस्त केली.
परेरा-गवई लिव्ह इनमध्ये
मुंबईतील तरुणी मनिषा गवई आणि गोव्यातील ड्रग्ज पुरवठादार परेरा हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. गोवा आणि मुंबईत त्यांचा मुक्काम असतो. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक विक्रेत्यांना त्यांनी अंमली पदार्थ पुरवले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.
परेरा, नंदीवाले दोघे वॉन्टेड
शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या ड्रग्ज विक्रीच्या गुन्ह्यात परेरा वॉन्टेड होता. कराड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अनिल नंदीवाले याचा शोध सुरू होता. दोन गुन्ह्यांतील वॉन्टेड आरोपी पोलिसांच्या हाती लागले.