Kolhapur: अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या भूसंपादन, पुनर्वसनाला प्राधान्य द्या; अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांची सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:20 IST2026-01-23T12:20:25+5:302026-01-23T12:20:56+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचा आढावा

Give priority to land acquisition and rehabilitation of Ambabai Temple development plan; Additional Chief Secretary Manisha Mhaiskar's instructions | Kolhapur: अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या भूसंपादन, पुनर्वसनाला प्राधान्य द्या; अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांची सूचना 

Kolhapur: अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या भूसंपादन, पुनर्वसनाला प्राधान्य द्या; अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांची सूचना 

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातील भूसंपादनासह, बाधितांच्या पुनर्वसनाला प्राधान्य द्या. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी एकत्रित कामांचे क्रम निश्चित करावेत. प्रथम आवश्यक कामांना निधी खर्च करावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी गुरुवारी दिल्या.

बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या श्री जोतीबा विकास आराखडा, खिद्रापूर, सारथी इमारत, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अशा विकासकामांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, पुरातत्त्व विभागाचे विलास वाहने यांची प्रमुख उपस्थिती होती.

म्हैसकर म्हणाल्या, सर्व मंजूर कामे विहित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करावीत. प्रत्येक कामांचे विविध टप्प्यांमध्ये विभागणी करून आराखडे सादर करावेत. प्राधान्यक्रम ठरवून आवश्यक कामे हाती घ्या. निधी प्राप्त होईल तशी पुढील कामे मंजुरीसाठी घ्यावीत. कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रथम विचार करावा.

जिल्हाधिकारी येडगे यांनी विविध विकासकामांची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी प्रास्ताविक केले. बैठकीनंतर अतिरिक्त मुख्य सचिव म्हैसकर यांनी करवीरनिवासिनी अंबाबाई, श्री जोतिबा मंदिरातील कामांची पाहणी केली. कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचीही त्यांनी माहिती घेतली.

Web Title: Give priority to land acquisition and rehabilitation of Ambabai Temple development plan; Additional Chief Secretary Manisha Mhaiskar's instructions