शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दोन दिवसांत द्या, अन्यथा खळखट्याक; मनसे सहकार सेनाध्यक्षांचा इशारा

By पोपट केशव पवार | Published: January 15, 2024 06:46 PM2024-01-15T18:46:44+5:302024-01-15T18:47:18+5:30

कोल्हापूर : राज्य सरकारने २०१९ साली महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधून ५० हजार रुपये प्रोत्सहानपर अनुदान देण्याची घोषणा केली ...

Give incentive subsidy to farmers within two days, otherwise..; Warning of MNS cooperation army chief | शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दोन दिवसांत द्या, अन्यथा खळखट्याक; मनसे सहकार सेनाध्यक्षांचा इशारा

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दोन दिवसांत द्या, अन्यथा खळखट्याक; मनसे सहकार सेनाध्यक्षांचा इशारा

कोल्हापूर : राज्य सरकारने २०१९ साली महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधून ५० हजार रुपये प्रोत्सहानपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, या लाभापासून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाखांवर शेतकरी वंचित राहिले आहेत. सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच हा विषय नीटसा कळला नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अन्यथा मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करू असा इशारा मनसेचे नेते तथा मनसे सहकार सेनाध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी सोमवारी राज्य सरकारला पत्रकार परिषदेत दिला.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी सरकारने अनेक जाचक अटी लावल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाखांवर शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्याच्या मागणीसाठी मनसेचे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले हे दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. धोत्रे यांनी दिंडोर्ली यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

धोत्रे म्हणाले, शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभापासून वंचित ठेवण्यासाठी अधिकरी शेतकऱ्यांचा फुटबॉल करत आहेत. एखाद्या शेतकऱ्याने एकदाच कर्ज घेऊन ते परतफेड केले मात्र पुढील दोन वर्षात त्यास कर्ज काढण्यासाठी गरज भासली नसताना त्याने तीन वर्षात एकदाच कर्ज उचलले असले तरी त्याला या योजनेत अपात्र ठरवले आहे.

शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी जाणीवपूर्वक शेतकरी या योजनेपासून कसा वंचित राहिल यासाठी सरकार व काही अधिकारी धोरण राबवित आहेत. शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक लाभापासून वंचित ठेवण्याचे राजकारण मनसे कधीही खपवून घेणार नाही. येत्या दोन दिवसांत हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अन्यथा मनसे स्टाईलने खळखट्याक करू. यावेळी मनसेचे शेतकरी सेनाध्यक्ष संतोष नागरगोजे, राज्य सरचिटणीस बाळाभाऊ शेंडगे, जिल्हाध्यक्ष नागेश चौगले, योगेश खडके, जिल्हाध्यक्ष विजय करजगार उपस्थित होते.

Web Title: Give incentive subsidy to farmers within two days, otherwise..; Warning of MNS cooperation army chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.