Kolhapur News: माणसाळलेल्या ‘रंगा’वर गव्यांचा बहिष्कार, रानटी म्हशींसोबत जगण्याचा चमत्कार..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 11:52 IST2026-03-04T11:50:52+5:302026-03-04T11:52:44+5:30
विहिरीत पडून मोडला होता पाय

Kolhapur News: माणसाळलेल्या ‘रंगा’वर गव्यांचा बहिष्कार, रानटी म्हशींसोबत जगण्याचा चमत्कार..!
आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : भिन्न जातीच्या प्राण्याच्या पिलाला आपलेसे करून त्याला स्वीकारून त्याच्या सोबत जगण्याचा संदेश देणारी अनोखी घटना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली अभयारण्यात घडली आहे.
दीड वर्षापूर्वी मलकापूर (ता. शाहुवाडी) येथे विहिरीत पडून गव्याच्या पिलाचा पाय मोडला होता. जखमी असलेल्या या पिलाला पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये स्थलांतरित केले. मोडलेल्या पायाचे ऑपरेशन करून हे पिलू नोहेंबर २०२५ मध्ये चालण्यायोग्य झाल्यावर चांदोली अभयारण्यात सोडण्यात आले. थोडे लंगडत चालणाऱ्या या गव्याच्या पिलाला वनकर्मचाऱ्यांनी प्रेमाने ‘रंगा’ हे नाव दिले.
या दाट जंगल प्रदेशामध्ये खाण्यासाठी मुबलक अन्न गव्याच्या पिलाला असले तरी गवा प्रजात कशी जगते, काय खाते, कोणापासून धोका आहे, हे शिकवण्यासाठी गव्यांनी या ‘रंगा’ गव्याला स्वीकारले नाही. चांदोली धरणक्षेत्रातून स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील म्हशी ज्या जंगलात राहिल्या त्यांची संख्या वाढत गेली व त्या रानटी गुरांनी आता ‘रंगा’ला आपलेसे केले आहे. हा रंगा त्यांच्यासोबत एकत्र या दाट जंगलात फिरताना दिसतो.
ही रानटी गुरे जे खातात तेच हा गवा खातो. वाघासारख्या हिंस्त्र जनावराने जर हल्ला केला तर या म्हशी आक्रमक होऊन रंगाचे संरक्षणही करतात. उपचारामुळे माणसात राहिलेला गवा या रानटी गुरांसमवेत राहून तयार होत असून, निसर्ग अशा घटनांतून खूप काही शिकवतो. जगात युद्धाचे ढग दाटलेले असताना या म्हशींनी गव्याच्या पिलाला स्वीकारून प्रेमाची नवी परिभाषा घट्ट केली आहे.
म्हशींची व ‘रंगा’ची पहारा देण्याची अनोखी पद्धत
एका कळपात अंदाजे १० ते १५ म्हशी आहेत. रात्री सर्व जनावरे निवांत झोपावीत, याकरिता यातील दोन म्हशी बसलेल्या कळपाच्या विरुद्ध दिशेला तोंड करून उभे राहतात व कोणते जनावर हल्ला करणार नाही, याकडे लक्ष ठेवतात. रंगा ही पहारा देण्यासाठी उभे राहू लागला आहे.