'गॅस बुकिंग' ऑनलाईन व्यवस्था कोलमडली, मेसेजही बंद; कोल्हापुरात पोलिस बंदोबस्तात सिलिंडर वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:36 IST2026-03-13T17:35:00+5:302026-03-13T17:36:12+5:30

३० दिवसानंतरही बुकिंग होत नसल्याने अडचणी

Gas booking online system collapses, messages also stopped; Cylinder distribution under police protection in Kolhapur | 'गॅस बुकिंग' ऑनलाईन व्यवस्था कोलमडली, मेसेजही बंद; कोल्हापुरात पोलिस बंदोबस्तात सिलिंडर वितरण

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस बुकिंगची ऑनलाइन यंत्रणा कोलमडून पडली आहे. पहिला गॅस सिलिंडर घेऊन ३० दिवस झाल्यानंतरही बुकिंग होत नसल्याने ग्राहक हवालदिल बनले आहेत. कार्यालयात जाऊन बुकिंगसंबंधी विचारणार केल्यानंतरही उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. ग्राहकांना बेदखल केले जात असल्याने गॅस वितरक विरोधात संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस टंचाईही तीव्र होत आहे. परिणामी वितरकांच्या कार्यालयासमोर ग्राहकांची गर्दी होत आहे. नियमित बुकिंगसाठीचे नंबर बंद केले आहेत. त्या नंबरवर डायल केल्यानंतर परत बुकिंगचे मेसेज येणे बंद झाले आहे. यासंबंधी वितरकाकडे विचारणा करण्यासाठी कार्यालयात गेल्यानंतर कोणाकडूनही समाधानकारक उत्तर दिले जात नाही. कार्यालयातील लँडलाईन फोन उचलून माहिती देणेही अनेक ठिकाणी बंद केले आहे.

यामुळे ग्राहकांनी नवीन गॅसचे बुकिंग कसे करायचे ?, कधी करायचे ? कोणाकडे करायचे ? गॅस मिळणार की नाही. मिळाले तर कधी मिळणार ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहत आहेत. दोन्ही गॅस सिलिंडर संपले असलेल्यांची वाईट अवस्था झाली आहे. त्यांच्या जेवणाचा प्रश्न तयार झाला आहे.

घरपोहोच कधी मिळणार.. माहीत नाही..

बुकिंग केलेल्यांना सिलिंडर कधी घरपोहोच मिळणार, हे कोणीही ठोसपणे सांगत नाहीत. चार, पाच, आठ दिवस बुकिंग झाल्यानंतरही ग्राहक कधी गॅस सिलिंडर मिळणार अशी विचारणा करण्यासाठी वितरकांच्या कार्यालयातील संपर्क क्रमांकावर फोन करीत आहेत. व्यवस्थापकाच्या मोबाइलवर संपर्क साधत आहेत. पण सिलिंडर उद्या येईल, परवा येईल, चार दिवसानंतर येईल, असे उत्तर मिळत आहे. हे उत्तर ऐकून वैतागलेला ग्राहक शेवटी कार्यालय गाठून विचारणा करीत आहे. रिकामे सिलिंडर घेऊन कार्यालयाच्या दारात जाऊन अनेक ग्राहक ठाण मांडत आहेत. रांग लावत आहेत. तरीही त्यांना गॅस सिलिंडर मिळत नसल्याने संबंधित ग्राहकांचा संयम सुटत आहे.

कुटुंबात सदस्य संख्या अधिक असलेल्यांची कोंडी

कुटुंबात सदस्य संख्या जास्त असलेल्यांना गॅस टंचाईची तीव्र झळ बसत आहे. ग्रामीण भागात जळावू लाकूड सहज उपलब्ध होते. तेथे चुलीवर जेवण करणे शक्य आहे. पण शहरात, अपार्टमेंटमध्ये, बंगल्यात चूल कोठे पेटवायची, पेटवली तर त्याला सरपण कोणते वापरायचे, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Web Title : ऑनलाइन गैस बुकिंग व्यवस्था चरमराई; पुलिस सुरक्षा में सिलेंडर वितरण

Web Summary : युद्ध के कारण कोल्हापुर में गैस सिलेंडर की कमी। ऑनलाइन बुकिंग विफल, मैसेज बंद, ग्राहक परेशान। पुलिस सुरक्षा में वितरण, परिवार संघर्ष कर रहे हैं।

Web Title : Online Gas Booking System Collapses; Cylinder Distribution Under Police Protection

Web Summary : Kolhapur faces gas cylinder shortage due to war. Online booking fails, messages stop, causing customer frustration. Distribution under police protection as families struggle.