पोटच्या मुलीशी केले गैरकृत्य, पत्नीवर गोळी झाडण्याचा प्रयत्न; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 15:40 IST2022-12-23T15:40:02+5:302022-12-23T15:40:28+5:30
मुलगी घरात एकटी असताना केला विनयभंग

पोटच्या मुलीशी केले गैरकृत्य, पत्नीवर गोळी झाडण्याचा प्रयत्न; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
इचलकरंजी : स्वत:च्या अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य केल्याचा जाब विचारणाऱ्या पत्नीवर गोळी झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोक्क्यातील एका आरोपीवर गुन्हा दाखल झाला. या कारणावरून गेल्या दोन महिन्यांपासून पती वारंवार ठार मारण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार मुलीच्या आईने शहापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता २७ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
शहापूर येथील तुळजाभवानी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मोक्क्यातील आरोपीने ऑक्टोबर २०२२ मध्ये स्वत:ची मुलगी घरात एकटी असताना तिचा विनयभंग केला. त्यावेळी मुलगी तेथून पळून गेली. हा प्रकार मुलीने ८ नोव्हेंबरला आईला सांगितला. याबाबत पतीला जाब विचारत पत्नीने पुन्हा असा प्रकार घडल्यास नातेवाइकांना सांगेन. तसेच पोलिसांत तक्रार देईन, असे सांगितले. त्यावर चिडून पतीने पत्नीला धमकी देत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घरातील अल्पवयीन मुलगी व मुलाने त्याला बाजूला करत आईची सुटका केली.
त्यानंतर १० डिसेंबरला रात्रीच्या सुमारास पुन्हा दोघांच्यात वाद झाला. त्यावेळी पतीने बंदुकीतून पत्नीवर गोळी झाडली. त्यावेळी पत्नीने आपला बचाव केला. पुन्हा २१ डिसेंबरला वाद होऊन पतीने पत्नीचा गळा दाबत ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही मुलानेच त्याला बाजूला ढकलले. वारंवारच्या त्रासाला कंटाळून पत्नीने शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.