गणेशोत्सव मिरवणुका मध्यरात्री बारालाच बंद, कोल्हापूर पोलिस अधीक्षकांची गुन्हे आढावा बैठकीत सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:40 IST2025-08-08T13:39:18+5:302025-08-08T13:40:00+5:30

गुन्ह्यांचा तपास पूर्ण करा

Ganeshotsav processions to be stopped at midnight Kolhapur Superintendent of Police's instructions in crime review meeting | गणेशोत्सव मिरवणुका मध्यरात्री बारालाच बंद, कोल्हापूर पोलिस अधीक्षकांची गुन्हे आढावा बैठकीत सूचना

गणेशोत्सव मिरवणुका मध्यरात्री बारालाच बंद, कोल्हापूर पोलिस अधीक्षकांची गुन्हे आढावा बैठकीत सूचना

कोल्हापूर : गणेशोत्सवात आगमन आणि विसर्जन मिरवणुका रात्री बाराला बंदच होतील. यासाठी वेळेत मिरवणुका सुरू करून त्या वेळेत संपवण्याचा प्रयत्न करावा. मंडळांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी समन्वय ठेवावा, अशी सूचना पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकीत सर्व प्रभारी अधिका-यांना केली. तसेच एक वर्षाच्या आतील सर्व गुन्ह्यांची निर्गत करण्यास प्राधान्य द्या, असे अधिकाऱ्यांना सांगितले.

पोलिस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी मासिक गुन्हे आढावा बैठक झाली. या बैठकीत अधीक्षक योगेश कुमार यांनी गेल्या महिनाभरातील प्रमुख गुन्हे आणि तपासांचा आढावा घेतला. काही तपासांमध्ये सूचना केल्या. आगामी गोकुळाष्टमी, स्वातंत्र्य दिन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचे नियोजन करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गणेशोत्सवात आगमन आणि विसर्जन मिरवणूक रात्री बाराला संपलीच पाहिजे. 

रात्री बारानंतर मिरवणुका सुरू ठेवणा-या मंडळांवर गुन्हे दाखल करून त्यांची ध्वनियंत्रणा जप्त करावी. डीजे आणि लेसरचा वापर करणा-या मंडळांवर कडक कारवाई करावी असे त्यांनी सांगितले. उत्सवात महिलांच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी. अवैध धंदे बंदच राहावेत. गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना अधीक्षकांनी दिल्या.

बैठकीसाठी अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार, उपअधीक्षक सुवर्णा पत्की, अजित टिके, आप्पासो पवार, निरीक्षक रवींद्र कळमकर, संतोष डोके, संजीव झाडे, श्रीराम कन्हेरकर, सुशांत चव्हाण यांच्यासह सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

गुन्ह्यांचे तपास पूर्ण करा

दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून आरोपींवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करणे, रखडलेले तपास पूर्ण करण्याच्या सूचना अधीक्षकांनी सर्व प्रभारी अधिका-यांना दिल्या. विशेषत: एक वर्षाच्या आतील सर्व गुन्हे तत्काळ निर्गत करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. गुन्हे प्रलंबित राहिल्यास संबंधित प्रभारी अधिका-यांना जबाबदार धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Ganeshotsav processions to be stopped at midnight Kolhapur Superintendent of Police's instructions in crime review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.