बाबासाहेब नेर्ले -- गांधीनगर गांधीनगरमधील मध्यवर्ती असलेली जुनी पोलीस चौकी देखभाल दुरुस्तीविना नरक यातना सहन करत आहे. तिची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. किंबहुना ती मृत्यूचा सापळा बनली आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. एकीकडे नवीन पोलीस ठाणे सुधारताना दिसत आहे, तर दुसरीकडे जुनी पोलीस चौकीची अवस्था बिकट झाली आहे. या बाबींकडे संबंधित शासन कधी लक्ष देणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे. १९८० ला गांधीनगर विकास आराखडा मंजूर झाला. त्यावेळी सध्याच्या पोलीस ठाण्याच्या जागेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय तसेच सरकारी दवाखाना होता. कालांतराने जसजशी लोकसंख्या वाढत गेली तस तशी या कार्यालयांना जागा तोकडी पडत गेली. त्यामुळे हा दवाखाना दुसऱ्या जागेत स्थलांतर झाला. त्याच जागेमध्ये दोन खोल्यांची पोलीस चौकी होती. त्यावेळी गांधीनगर मार्केट हे एवढे प्रचलित नव्हते, पण गांधीनगर बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येऊ लागल्याने स्वतंत्र गांधीनगर पोलीस ठाणे मंजूर झाले. त्यामुळे जुन्या पोलीस चौकीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. सध्या जुन्या पोलीस चौकीला नरक यातना सोसाव्या लागत आहेत. या चौकीमध्ये कचरा, तसेच भटक्या कुत्र्यांचा अड्डा बनला आहे. त्यातच काही कुत्री मरून पडली. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. तसेच चौकीच्या दगडी भिंती या पडझडीने भग्न अवस्थेत आहेत. जुनी चौकी ही मध्यवर्ती असल्याने येथे लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या चौकीच्या आजुबाजूला काही भेल गाड्या, आइस्क्रीमच्या गाड्याही आहेत. त्यामुळे येथील लोकांच्या जिवावर बेतणारे एखादे संकट येऊ शकते. त्यामुळे या पोलीस चौकीची संबंधित प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.एकंदरीत जुन्या पोलीस चौकीचे नशीब केव्हा उघडणार आणि येथील आवारात वावरणाऱ्यांचा जीव भांड्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एखादी दुर्घटना घडण्याच्या पूर्वीच या पोलीस चौकीचे नशीब उघडण्यासाठी प्रशासन काय पाऊल उचलणार एवढेच पाहणे येथील नागरिकांच्या नशिबी आहे. त्यासाठी प्रशासन कधी जागे होते एवढेच काम येथील नागरिकांचे नसून हे संकट दूर करण्यासाठी लोकजागृतीची गरज उरली आहे.
गांधीनगर जुनी पोलीस चौकी भोगते नरक यातना
By admin | Updated: November 18, 2015 00:10 IST