Kolhapur- Gokul politics: डावपेचांचा अंदाज आल्याने गडहिंग्लज-चंदगडकर झाले सावध, शिरोळमध्येही अस्वस्थता
By राजाराम लोंढे | Updated: August 28, 2025 17:45 IST2025-08-28T17:45:19+5:302025-08-28T17:45:44+5:30
जिल्हाभर नेटवर्क त्याचाच विजय

Kolhapur- Gokul politics: डावपेचांचा अंदाज आल्याने गडहिंग्लज-चंदगडकर झाले सावध, शिरोळमध्येही अस्वस्थता
राजाराम लोंढे
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या मागील दोन्ही निवडणुकींतील करवीर, पन्हाळा व कागल तालुक्यांतील राजकीय डावपेचाचा अंदाज गडहिंग्लज विभागातील नेत्यांसह दूध संस्था प्रतिनिधींना आला आहे. त्यामुळे त्यांनी ठरावाची गोळाबेरीज करण्यापासूनच सावध भूमिका घेतली असून काहीही झाले तरी यावेळी मागील पराभवाचा वचपा काढायचाच, या इराद्याने येथील नेत्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचे पडसाद या तालुक्यांच्या संपर्क सभेतून दिसून येत आहेत.
‘गोकुळ’च्या मागील निवडणूकीत २१ जागा होत्या. दोन्ही पॅनेलने शिरोळ तालुक्याला उमेदवारी दिली नव्हती. शिरोळला वगळून हातकणंगले तालुक्याला संधी दिली होती. चंदगडमधून तत्कालीन सत्तारुढ गटातून दीपक पाटील, तर विरोधी गटातून सुष्मिता राजेश पाटील रिंगणात होत्या. गडहिंग्लजमधून सत्तारूढ गटातून सदानंद हत्तरकी व प्रकाश चव्हाण, तर विरोधी गटातून महाबळेश्वर चौगुले व विद्याधर गुरबे यांना पॅनेलमध्ये संधी दिली होती.
पण, मताच्या साठमारीत सगळेच पराभूत झाले. शिरोळ, गडहिंग्लज, चंदगड हे तालुके मोकळे राहिल्याने गेल्या सव्वाचार वर्षांत दूध संस्था प्रतिनिधीमध्ये काहीशी अवस्थता पाहावयास मिळत आहे. प्रतिनिधी नसल्याने काय नुकसान होते, याची जाणीव झाल्याने गडहिंग्लज विभाग आता एकवटला असून, मागील निवडणुकीत झालेल्या चुका शोधून आगामी निवडणुकीची बांधणी सुरू केली आहे.
जिल्हाभर नेटवर्क त्याचाच विजय
‘गोकुळ’च्या निवडणुकीत ज्या उमेदवाराचे संपूर्ण जिल्ह्यात नेटवर्क असते, त्याचा विजय सोपा होतो. ‘गोकुळ’च्या २०१५ च्या निवडणुकीत विरोधी पॅनेलमधून चंद्रकांत बोंद्रे व अंबरीष घाटगे विजयी झाले होते. त्यावेळी, दिलीप पाटील व सदानंद हत्तरकी यांचा पराभव झाला होता. २०२१ च्या निवडणुकीत विरोधी पॅनेलमधून शौमिका महाडिक, बाळासाहेब खाडे, अंबरीष घाटगे, डॉ. चेतन नरके यांनी बाजी मारली. खाडे वगळता महाडिक, घाटगे, नरके हे दिग्गज घरातील उमेदवार होते.
शिरोळमधून रणजीत पाटील यांची चाचपणी
मागील निवडणुकीत दोन्ही पॅनेलने शिरोळ तालुक्याला वगळल्याने तेथील नेत्यांनी आतापासूनच जोडण्या लावल्या आहेत. ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांचे सुपुत्र रणजीत पाटील यांनी चाचपणी सुरू केली असून, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी त्यांना ग्रीन सिंग्नल दिल्याचे समजते. महायुतीच्या पॅनेलमध्ये आमदार पाटील-यड्रावकर यांना एक जागा मिळणार हे निश्चित आहे.
मागील निवडणुकीत अशी पडली होती मते..
- सत्तारूढ - १९३९
- विरोधी - १६६३