Kolhapur Crime: आईवरून शिवी दिल्याने मित्राचा गळा चिरून खून, हल्लेखोरास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 11:42 IST2025-09-05T11:41:38+5:302025-09-05T11:42:12+5:30
हनुमाननगर येथील वृद्धाच्या खुनाचा चार तासांत उलगडा

Kolhapur Crime: आईवरून शिवी दिल्याने मित्राचा गळा चिरून खून, हल्लेखोरास अटक
कोल्हापूर : किरकोळ वादात आईवरून शिवी दिल्याने आयटीआय कॉलेजजवळ हनुमाननगर येथे राहणारे मोहन नारायण पोवार (वय ७०) यांचा जीवलग मित्राने चाकूने गळा चिरून खून केला. हा प्रकार गुरुवारी (दि. ४) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून चार तासांत हल्लेखोर चंद्रकांत केदारी शेळके (७३, रा. मोहिते मळा, देवकर पाणंद, कोल्हापूर) याला अटक केली.
घटनास्थळ आणि जुना राजवाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहन पोवार यांच्या पत्नीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मुलगा पुष्कराज (वय ३१) याच्यासह ते पाचगाव रोडवरील घरात राहत होते. मुलगा शहरातील एका महाविद्यालयात नोकरी करतो. तो गुरुवारी सकाळी ८ वाजता घरातून बाहेर पडला. मोहन पोवार हेदेखील सकाळी रिक्षा घेऊन घराबाहेर पडले होते. १० वाजेच्या सुमारास ते परत घरी आले.
साडेअकराच्या सुमारास त्यांच्या घरातून धुराचे लोट येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती मोबाइलवरून पुष्कराज याला दिली. त्यानंतर स्वयंपाक घराचे दार उघडून आग विझवण्यासाठी शेजारी धावले. पाणी ओतून त्यांनी बेडरूममधील आग विझवली. धूर कमी झाल्यानंतर त्यांना मोहन पोवार हे बेडवर मृतावस्थेत पडल्याचे लक्षात आले. जवळच चाकू पडला होता. अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या गळ्यावर जखम होती.
शेजाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोवार यांच्या मुलास आणि जुना राजवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने पोहोचून पंचनामा केला. शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे, करवीरचे निरीक्षक किशोर शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर आणि उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली.
सीसीटीव्ही फुटेजवरून खुनाचा उलगडा
पोवार यांची आत्महत्या आहे की खून, याबाबत सुरुवातीला संभ्रमावस्था होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या घराकडे जाणारी एक व्यक्ती समोरच्या घरावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसत होती. त्यावरून पोलिसांनी शोध घेऊन अवघ्या चार तासांत हल्लेखोर चंद्रकांत शेळके याला त्याच्या घरातून अटक केली. चौकशीला सुरुवात करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. जुना राजवाडा पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी संयुक्त तपास केला.
जीवलग मित्राकडून खून
मोहन पोवार आणि चंद्रकांत शेळके हे दोघे जीवलग मित्र होते. एकाच कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. गुरुवारी सकाळी शेळके हे फिरत फिरत पोवार यांच्या घरी पोहोचले. दोघांच्या गप्पा सुरू होत्या. पोवार यांनी मित्राला चहा करून दिला. जुन्या विषयावरून दोघांत वादाला सुरुवात झाली. त्यावेळी पोवार यांनी शेळके यांना आईवरून शिवी दिली. याचा राग आल्याने दोघांत झटापट झाली. शेळके याने जवळच पडलेल्या चाकूने पोवार यांचा गळा चिरला. त्यानंतर तो पळून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली. शेळके विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले आहेत.
आगीचे कारण अस्पष्ट
हल्लेखोर शेळके घरातून निघून गेल्यानंतर काही वेळाने धुराचे लोट उसळले. पळून जाताना एक विद्युत वायर त्यांच्या हातात अडकली होती. त्यामुळे शॉर्ट सर्किटने किंवा दोघांच्या झटापटीत देव्हाऱ्यावरील समई पडल्यामुळे घरात आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. फॉरेन्सिकच्या अहवालातून आगीचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.