विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, तरी कर्नाटक एसटी फायद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 05:36 PM2021-11-16T17:36:53+5:302021-11-16T17:38:14+5:30

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : बेंगलोर शहर आणि परिसरातील आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी उच्च दर्जाची वातानुकूलित वज्रा व्हॉल्वो बससेवा देशात पहिल्यांदा ...

Free travel for students though Karnataka ST benefits | विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, तरी कर्नाटक एसटी फायद्यात

विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, तरी कर्नाटक एसटी फायद्यात

Next

भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : बेंगलोर शहर आणि परिसरातील आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी उच्च दर्जाची वातानुकूलित वज्रा व्हॉल्वो बससेवा देशात पहिल्यांदा सुरू करून यशस्वीपणे चालविली जाते, असा दावा बेंगलोर परिवहन महामंडळाने केला आहे.

सध्या तिथे रोज या सेवेच्या ६५८ बसफेऱ्या आहेत. कर्नाटकात प्राथमिक, माध्यमिक, अनुसूचित, जाती, जमातीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत बससेवा दिली जाते. याउलट महाराष्ट्रातील बससेवा दिवसेंदिवस विस्कळीत होत राहिली. म्हणूनच कर्नाटकातील बससेवा महाराष्ट्रापेक्षा भारी, अशी सहज प्रतिक्रिया उमटते.
बेंगलोरमध्ये देशात सर्वप्रथम २००६मध्ये आयटीतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधेची बससेवा सुरू केली. ती चांगल्याप्रकारे सुरू असून, त्यातून चांगले उत्पन्नही मिळत आहे. आंतरराज्य, कर्नाटक अंतर्गत सुरक्षित, परवडणारी, दर्जेदार, विनम्र, खात्रीशीर बससेवा देण्यावर अधिक भर दिला जात आहे. विशेषत: लांब पल्ल्याच्या बसमध्ये स्वच्छता ठेवली जाते. यासाठी तेथील सर्व पक्षांच्या सरकारचे आर्थिक पाठबळ राहिले.

कर्नाटकात महामंडळाचे चार विभागांत विभाजन झाल्याने प्रशासकीय कामकाज गतीने होते. प्रत्येक विभागासाठी वेगळी व्यवस्थापकीय समिती कार्यरत आहे. त्या समितीमध्ये लोकप्रतिनिधींसह आयएएस, आयपीएस अधिकारी आहेत. यामुळे राज्यभर प्रवासी केंद्रित सेवा देणे शक्य झाले आहे. महाराष्ट्रात मात्र लोकप्रतिनिधींमधील दूरदृष्टीचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञान वापराबद्दलची उदासीनता, पारदर्शकतेकडे केलेल्या दुर्लक्षामुळे येथील एसटीची चाके गाळातच रूतत चालली आहेत.

दृष्टिक्षेपात सवलती

कर्नाटक : स्वातंत्र्यसैनिकांना मोफत प्रवास, व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम, महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष ॲप, सुरक्षिततेसाठी ५ हजार बसमध्ये आणि प्रमुख बसस्थानकांत सीसीटीव्ही कॅमेरे, वातानुकूलित, निमआराम बससेवा, ऑनलाईन बुकिंग, पर्यटनासाठी पॅकेज, नोकरदार पास योजना, पूर्णपणे मोफत सुविधेव्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात एकदाच सवलतीचा पास काढण्याची मुभा.

महाराष्ट्र : दुर्धर आजारी, डायलेसिस आणि हिमोफेलिया रुग्ण, अपंग गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यासह विविध पुरस्कारप्राप्त खेळाडूंना विशिष्ट किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास. स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या एका साथीदाराला वर्षभर ४ ते ८ हजार किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात मासिक पास.

प्राथमिक, माध्यमिक तसेच अनुसूचित जाती, जमातीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत बससेवा दिली जाते. याशिवाय प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याकडे अधिक लक्ष दिले जाते. यामुळेच महामंडळ सक्षम आहे. - परशराम किरणगी, जनसंपर्क अधिकारी, वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळ, हुबळी

Web Title: Free travel for students though Karnataka ST benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.