Kolhapur: वसुलीची रक्कम केली गायब; भारत फायनान्शियलची ३० लाखांची फसवणूक, तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 17:26 IST2025-01-11T17:24:42+5:302025-01-11T17:26:23+5:30
एकास अटक, नांदणीचा फरार

Kolhapur: वसुलीची रक्कम केली गायब; भारत फायनान्शियलची ३० लाखांची फसवणूक, तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा
कोल्हापूर : कर्जदारांकडून वसूल केलेली २९ लाख ७३ हजारांची रक्कम गायब करून भारत फायनान्शियल कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी तिघा वसुली कर्मचाऱ्यांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी संशयित विनायक महादेव घोटणे (तारदाळ, ता. हातकणंगले) याला अटक झाली. अमोल संजय जगताप (रा. पंढरपूर) आणि पवन शिवाजी पवार (नांदणी, शिरोळ) या दोघांचा शोध सुरू आहे. कंपनीने केलेल्या लेखा परीक्षणातून हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक आशुतोष अनंतकुमार साळुंखे (वय २७, रा. सांगली) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत फायनान्शियल कंपनीचे सानेगुरुजी वसाहत मुख्य रस्त्यावर कार्यालय आहे. त्या ठिकाणी संशयित अमोल जगताप, विनायक घोटणे व पवन पवार हे तिघे जण वसुली कर्मचारी म्हणून कामाला होते. जगताप याने ऑक्टोबर २०२१ ते ऑगस्ट २०२२ कर्जदारांकडून ६ लाख ७२ हजार ८४० रुपये वसूल केले होते.
विनायक घोटणे याने ६५ कर्जदारांकडून हप्त्यासाठीचे १८ लाख, ७७ हजार ३३४ रुपये डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ कालावधीत वसूल केले होते. पवार याने २१ कर्जदारांकडून ४ लाख २३ हजार ७३१ रुपयांची वसुली केली होती. कंपनीने त्या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण केले. त्यातून २९ लाखांची तफावत असल्याचे लेखापरीक्षकांच्या लक्षात आले. संशयितांनी ही रक्कम कंपनीत भरली नसल्याचे उघड झाले. या तिघांनी रकमेची अफरातफर केल्याची फिर्याद कंपनीच्या व्यवस्थापकांनी जुना राजवाडा पोलिसांत दाखल केली.