Kolhapur: पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स उलटली, चार प्रवासी जखमी
By उद्धव गोडसे | Updated: May 26, 2025 13:04 IST2025-05-26T13:03:06+5:302025-05-26T13:04:36+5:30
महामार्ग रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.

Kolhapur: पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स उलटली, चार प्रवासी जखमी
उद्धव गोडसे
कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर अंबप फाटा (ता. हातकणंगले) येथे खासगी ट्रॅव्हल्स उलटून झालेल्या अपघातात चार प्रवासी जखमी झाले. जगदीश पुजारी (वय ४२), उषा पुजारी (३३, सध्या दोघे रा. बिबेवाडी, पुणे, मूळ रा. केरळ) आणि रतन जयराम अनशन (४०, रा. लोअर परळ, मुंबई) अशी जखमींची नावे आहेत. यासह एक मुलगाही जखमी झाला. हा अपघात सोमवारी (दि. २६) सकाळी सातच्या सुमारास घडला. खासगी बस बंगळुरूहून पुण्याकडे निघाली होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस बंगळुरूहून पुण्याकडे निघाली होती. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास अंबप फाटा येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस उलटली. काही अंतर घसरत गेलेली बस मातीच्या ढिगा-याजवळ जाऊन थांबली. या अपघातात बसमधील चार प्रवासी जखमी झाले.
जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. अपघातावेळी बसची गती कमी असल्याने जीवितहानी टळली. तीन दिवसांपूर्वीच या परिसरात मेनन पिस्टन कंपनीजवळ खासगी ट्रॅव्हल्सने ट्रकला धडक दिली होती. त्या अपघातात एक ठार, तर १६ प्रवासी जखमी झाले होते. महामार्ग रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे.