कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:41 IST2025-07-07T13:40:44+5:302025-07-07T13:41:09+5:30

अथणी-विजापूर मार्गावर तीन महिन्यात तिसरा अपघात

Four killed in car and bus accident near Athini in Karnataka | कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

अथणी : कर्नाटकातील अथणीनजीक असणाऱ्या जेवर्गी-संकेश्वर या राज्य मार्गावर कोल्हापूरहून देवदर्शन आटोपून अफजलपूर-गुलबर्गाकडे निघालेली कार आणि बसचा रविवारी सकाळी अकरा वाजता भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अफझलपूर (जि. कलबुर्गी, कर्नाटक)चे चौघेजण ठार झाले असून एक जखमी आहे. हा अपघात इतका भयानक होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला.

अधिक माहिती अशी की, अफझलपूर (जि. कलबुर्गी, कर्नाटक) या शहरातील राहुल मेळशी व त्यांचे कुटुंब व नातेवाईक कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीच्या दर्शन करून कारने रविवारी गावाकडे परत चालले होते. अथणी शहरानजीक तांबाहून मिरजला जाणारी बस (क्रमांक के २८ एफ २४७०) व कार (क्रमांक केए ३८ एम ४५०९) चा भीषण अपघात झाला. त्यामध्ये कारचा चक्काचूर झाला. बसमध्ये कोणालाही इजा झाली नाही. या घटनेमध्ये कारमधील तिघे जागीच ठार झाले, तर एका महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 

मृतांमध्ये चालक गिरीश अशोक बेळोरगी (वय २८, रा. अफजलपूर), संगमेश गिरीश अमरगाेंड (वय २६, रा. अफजलपूर), राहुल मिळशी, राधिका राहुल मिळशी (वय २२,रा. अफझलपूर) या चौघांचा मृतांमध्ये समावेश आहे. कारमधील विनायक तिवारी हा या अपघातातून एकमेव व्यक्ती बचावला. त्याच्यावर अथणी शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या अपघातात कार व बसचे मोठे नुकसान झाले आहे. अथणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन उपार यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.

अथणी-विजापूर मार्गावर तिसरा अपघात

अपघातानंतर बराचवेळ रस्त्यावर वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. अथणी-विजापूर राज्य मार्गावर गेल्या तीन महिन्यांत हा तिसरा अपघात झाला असून, या मार्गावर अपघाताच्या संख्येत वाढ होत असलेली दिसून येत आहे. अथणी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली.

Web Title: Four killed in car and bus accident near Athini in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.