‘कोल्हापूर सर्किट बेंच’साठी चार न्यायमूर्तीं; सोमवारपासून कामकाजास प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 12:45 IST2025-08-16T12:44:19+5:302025-08-16T12:45:33+5:30
बसण्याच्या जागा, कामकाजाचे स्वरूप निश्चित

‘कोल्हापूर सर्किट बेंच’साठी चार न्यायमूर्तीं; सोमवारपासून कामकाजास प्रारंभ
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचचे कामकाज सोमवारपासून (दि. १८) सुरू होत आहे. यासाठी चार न्यायमूर्तींची नियुक्ती झाली. कामकाजासाठी त्यांच्या बसण्याच्या जागा आणि कामाचे स्वरूप निश्चित झाले. मुंबई उच्च न्यायालयातील रजिस्ट्रार एच. एम. भोसले यांच्या स्वाक्षरीने हा आदेश गुरुवारी (दि. १४) प्रसिद्ध झाला.
न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला यू. देशमुख यांची जुन्या कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीमधील कोर्ट रूम क्रमांक एकमधील खंडपीठामध्ये नियुक्ती झाली. त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या जनहित याचिका, सर्व नागरी रिट याचिका, फर्स्ट अपील, फॅमिली कोर्ट अपिल, करसंबंधी वाद, कमर्शियल कोर्ट्स ॲक्टमधील अपील, लेटर्स पेटंट अपील, तसेच सर्व गुन्हेगारी रिट, फौजदारी अपिल, मृत्युदंडाची पुष्टी असलेले खटले, गुन्हेगारी अवमान याचिका आणि पॅरोल, फर्लो, शिक्षा कमी करण्यासंबंधी विनंतीची प्रकरणे असतील.
सिंगल बेंच क्रमांक एकचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे आरसीसी इमारतीमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या कोर्ट रूम क्रमांक दोनमध्ये बसतील. त्यांच्याकडे सर्व फौजदारी अपील, गुन्हेगारी रिट, क्रिमिनल रिव्हिजन, जामीन व अटकपूर्व जामीन अर्ज, तसेच मध्यस्थी व सलोखा कायद्यानुसार येणारी प्रकरणे सुनावणीस असतील.
सिंगल बेंच क्रमांक दोनचे न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर हे आरसीसी इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील कोर्ट रूम क्रमांक तीनमध्ये बसतील. ते नागरी रिट याचिका, सेकंड अपील, नागरी पुनरावलोकन अर्ज, आदेशाविरुद्धचे अपील आणि कंपन्या कायदा व बँकिंग रेग्युलेशन ॲक्टअंतर्गत येणारी प्रकरणे हाताळतील.
न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक
न्यायमूर्ती कर्णिक हे मूळचे नाशिकचे आहेत. त्यांचे कायदेविषयक शिक्षण पुण्यात पूर्ण झाले. मार्च २०१६ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयात नियुक्त झाले.
न्यायमूर्ती शर्मिला देशमुख
न्यायमूर्ती देशमुख यांचे कायदेविषयक शिक्षण ठाणे येथील लॉ कॉलेजमधून पूर्ण झाले. जुलै २०२२ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात नियुक्ती झाली. न्यायमूर्ती कर्णिक आणि न्यायमूर्ती देशमुख डिव्हिजन बेंचचे कामकाज पाहणार आहेत.
न्यायमूर्ती शिवकुमार दिगे
न्यायमूर्ती दिगे हे मूळचे लातूरचे आहेत. लातूर येथील लॉ कॉलेजमधून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. जून २०२१ पासून त्यांची मुंबई उच्च न्यायालयात नियुक्ती झाली.
न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर
न्यायमूर्ती चपळगावकर हे मूळचे बीड येथील आहेत. प्राथमिक शिक्षण बीडमध्ये झाल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी औरंगाबादमधून पूर्ण केले. नोव्हेंबर २०२२ पासून त्यांची मुंबई उच्च न्यायालयात नियुक्ती झाली.
वंचित घटकांना प्राधान्य
अत्यावश्यक आणि वरिष्ठ नागरिक तसेच वंचित घटकांच्या प्रकरणांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाच वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेले खटले, आरोपी जेलमध्ये असलेल्या फौजदारी अपिलांनाही प्राधान्य दिले जाईल. तसेच निवडणूक याचिकांसाठी संबंधित न्यायमूर्ती आठवड्यातील सोयीच्या दिवशी सुनावणी घेतील, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.
कर्मचारी दाखल
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी सव्वादोनशेहून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. यातील बहुतांंश कर्मचारी, अधिकारी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यातील अनेकांनी त्यांचे कामकाज सुरू केले आहे. खटल्यांची कागदपत्रे योग्य रीतीने लावणे, कोर्ट रूम तयार करण्याची लगबग सध्या सुरू आहे.