Kolhapur Crime: बारमध्ये वेटरसोबत झालेल्या वादातून बँक व्यवस्थापकाचा खून, चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:49 IST2025-10-29T11:48:30+5:302025-10-29T11:49:01+5:30
कबनूरमधील प्रकार; डोक्यात घातला दगड

Kolhapur Crime: बारमध्ये वेटरसोबत झालेल्या वादातून बँक व्यवस्थापकाचा खून, चौघांना अटक
इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील मुख्य मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाचा डोक्यात दगड आणि सिमेंट पाइप घालून निर्घृण खून करण्यात आला. अभिनंदन जयपाल कोल्हापुरे (वय ४४, रा. इंदिरानगर, कबनूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. बारमध्ये वेटरसोबत झालेल्या वादातून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
पंकज संजय चव्हाण (२७, रा.फॅक्टरी रोड कबनूर), रोहित जगन्नाथ कोळेकर (२४, रा. कागल), विशाल राजू लोंढे (३१) आणि आदित्य संजय पोवार (२१, दोघे रा. लालनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, अभिनंदन हे एका खासगी बॅंकेत वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक म्हणून काम करत होते. सोमवारी (दि.२७) रात्री ते कोल्हापूर रोडवरील एका बारमध्ये गेले होते. तेथे वेटरशी वाद झाल्यानंतर ते बारमधून घरी गेले. त्यानंतर थोड्याच वेळात पंकज चव्हाण व अन्य अनोळखी तीन ते चारजण घरी आले. त्यांनी बारमध्ये भांडण झाले आहे, यासंदर्भात आम्ही अभिनंदन यांना पोलिस ठाण्यात घेऊन जाणार असल्याचे त्यांच्या वडिलांना सांगून अभिनंदन यांना मोटारसायकलवर बसवून घेऊन गेले.
बराच वेळ झाला तरी अभिनंदन परत न आल्याने डॉ. अभिषेक हे वडिलांसोबत पंकज याच्या घरी गेले. तेथे पंकजचा भाऊ व वडिलांना विचारले असता, पंकज घरी नसल्याचे समजले. भावाने पंकजला फोन लावला. त्यावेळी त्याने रुई फाटा येथे असल्याचे सांगितले. त्याला तेथेच थांबण्यास सांगून डॉ. अभिषेक व पंकजचा भाऊ सूरज हे दोघे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून रुई फाटा येथे जात असताना कबनूर येथील पेट्रोल पंपाजवळ अभिनंदन हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.
अभिनंदन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे तसेच जवळ सिमेंट पाइप पडल्याचे आढळले. तेथून सूरजने भाऊ पंकज याला फोन करण्याचा प्रयत्न केला असता पंकजचा फोन बंद होता. त्यामुळे त्याने साथीदारांसह अभिनंदन यांना घरातून बोलावून नेऊन खून केल्याची तक्रार अभिषेक यांनी दिली.
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी भेट दिली. माहिती घेऊन तपासाची चक्रे गतिमान केली. त्यानुसार पंकज हा साथीदारांसह जयसिंगपूर रोडवरील चौंडेश्वरी फाटा येथे येणार असल्याची माहिती समजली. त्यानुसार तेथून चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता बारमध्ये अभिनंदन यांचा रोहित कोळेकर या वेटरसोबत वाद झाला होता. त्या रागातून साथीदारांच्या मदतीने खून केल्याची त्यांनी कबुली दिली.
सुशिक्षित कुटुंब
अभिनंदन यांचे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आहे. त्यांचे आई-वडील शिक्षक होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. भाऊ डॉक्टर व भावाची पत्नी शिक्षिका, असे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आहे.
नातलग व मित्र परिवार
अभिनंदन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ-भावजय असा परिवार आहे. कबनूर व परिसरात त्यांचे नातलग आणि मोठा मित्र परिवार असल्याने घटनेची माहिती मिळताच त्यांच्या घरासमोर मोठी गर्दी जमली होती.