Kolhapur Politics: संजयबाबांना सर्वांची साद, कोणाला प्रतिसाद?; मंडलिक यांचीही चाचपणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:32 IST2026-01-06T19:31:57+5:302026-01-06T19:32:32+5:30
महायुतीचीही शक्यता

Kolhapur Politics: संजयबाबांना सर्वांची साद, कोणाला प्रतिसाद?; मंडलिक यांचीही चाचपणी सुरू
जे. एस. शेख
कागल : तालुक्यात जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून, मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांची युती होणार हे निश्चित आहे. मात्र, या दोघांनी घातलेल्या सादाला माजी आमदार संजय घाटगे यांनी अजून प्रतिसाद दिलेला नाही. उलट मुश्रीफ - राजे युतीला कडाडून विरोध करणारे माजी खासदार संजय मंडलिक यांनी संजयबाबांना सोबत घेऊन या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे सध्या तरी ''संजयबाबा''च्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुरगुडमध्ये मिळालेल्या घवघवीत यशामुळे मंडलिक गट आक्रमक झाला आहे. तर, कागल व गडहिंग्लजसारख्या मोठ्या पालिका जिंकल्यामुळे मुश्रीफ गटात उत्साह संचारला आहे. समरजित घाटगे गटाचे कार्यकर्ते नव्या युतीने प्रफुल्लित झाले आहेत. मंत्री मुश्रीफ व समरजित घाटगे यांच्यातील जवळीक संजय घाटगे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना पचनी पडायला तयार नाही. तर, संघर्षातून नवा जनाधार निर्माण होऊन गट अधिक प्रबळ होईल, असे मंडलिक यांना वाटू लागले आहे. यातून संजय घाटगेंना सोबत घेण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरू केल्या आहेत.
आजचे चित्र
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा व पंचायत समितीच्या बारा जागा आहेत. यापैकी कोणाशी युती केली तर किती जागा पदरात पडणार याची चाचपणी संजय घाटगे गटात सुरू आहे. जर, मंडलिक - संजय घाटगे गट एकत्र आले तर निवडणुकीत चुरस होणार हे अटळ आहे. पण, जर संजय घाटगे गट मंत्री मुश्रीफ - राजे गटा बरोबर आला तर काही मतदारसंघ वगळता फारशी चुरस उरणार नाही.
महायुतीचीही शक्यता
मंत्री मुश्रीफ (राष्ट्रवादी - अजित पवार गट), संजय मंडलिक (शिंदे सेना), संजय घाटगे (भाजपा) हे प्रमुख तीन नेते सध्या महायुतीत आहेत. समरजित घाटगेही याच वाटेवर आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांचा आदेश म्हणून चारही नेते एकत्र येऊ शकतील, असाही अंदाज व्यक्त होत आहे.