Kolhapur Politics: ‘गोकुळ’च्या राजकारणात 'आप्पा' पुन्हा सक्रिय, विरोधी मोट बांधणीसाठी विविध नेत्यांशी संपर्क 

By राजाराम लोंढे | Updated: May 29, 2025 19:25 IST2025-05-29T19:00:32+5:302025-05-29T19:25:24+5:30

महायुतीतील नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Former MLA Mahadevrao Mahadik is active again in Gokul politics | Kolhapur Politics: ‘गोकुळ’च्या राजकारणात 'आप्पा' पुन्हा सक्रिय, विरोधी मोट बांधणीसाठी विविध नेत्यांशी संपर्क 

Kolhapur Politics: ‘गोकुळ’च्या राजकारणात 'आप्पा' पुन्हा सक्रिय, विरोधी मोट बांधणीसाठी विविध नेत्यांशी संपर्क 

राजाराम लोंढे

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्याराजकारणावर वीस-पंचवीस वर्षे पकड असलेले माजी आमदार महादेवराव महाडिक हे पुन्हा सक्रिय झाले असून, त्यांनी विरोधी मोट बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील विविध नेत्यांशी संपर्क सुरू केला आहे. महायुतीतील नेते आगामी काळात काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

महाडिक यांनी जवळपास वीस वर्षे ‘गोकुळ’च्याराजकारणावर पकड ठेवली होती. मात्र, मागील पंचवार्षिक मध्ये सत्तारूढ गटातील ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे व शशिकांत पाटील-चुयेकर यांना आपल्याकडे खेचत विरोधी पॅनेलचे प्रमुख वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी सत्तांतर केले. गेल्या पाच वर्षांत महादेवराव महाडिक सक्रिय राजकारणापासून काहीसे अलिप्त झाले होते. मात्र, ‘गोकुळ’च्या राजकारणात त्यांच्या स्नूषा शौमिका महाडिक यांनी सत्तारूढ गटाविरोधात आघाडी उघडली.

अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्या नाट्यानंतर ‘गोकुळ’च्या दुधाला पुन्हा उकळी आली आहे. अध्यक्ष निवडीतच सत्तांतर करायचा चंग महायुतीतील काही नेत्यांचा होता, पण मंत्री मुश्रीफ हे ठाम राहिल्याने तो फसला. आगामी निवडणूक एकतर्फी असल्याचे सत्तारूढ गटाच्या काही संचालकांना वाटते. मात्र, महादेवराव महाडिक यांनी तगडे पॅनेल बांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही नेत्यांशी त्यांनी चर्चाही केल्याचे समजते. याबाबत, माजी आमदार महादेवराव महाडिक यांना फोन केला असता, त्यांनी उचलला नाही.

अध्यक्ष निवडीत आगामी निवडणुकीची बिजे

‘गोकुळ’च्या अध्यक्ष राजीनामा व नवीन अध्यक्ष निवडीत आगामी निवडणुकीची बिजे पेरली गेली आहेत. सत्तारूढ गटातील बंडाळीचा फायदा चार वर्षे शांत असलेल्या विरोधी गटाने उठवण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी पेरणी सुरू केली आहे.

आबीटकर, कोरे, नरके यांच्या भूमिकेकडे लक्ष

‘गोकुळ’च्या राजकारणात पालकमंत्री प्रकाश आबीटकर, आमदार विनय काेरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक आदी नेत्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. आगामी निवडणुकीत हे नेते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

वाढीव सभासदांवर सत्तारूढ गटाची भिस्त

गेल्या चार वर्षांत ‘गोकुळ’चे दोन हजार सभासद वाढले होते. या सभासदांवरच सत्तारुढ गटाची भिस्त आहे. त्यामुळेच सत्तारूढ गटावर काही नेते नाराज असले, तरी फारकत घेण्याचे धाडस करण्याची शक्यता कमी आहे.

Web Title: Former MLA Mahadevrao Mahadik is active again in Gokul politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.