आई.. हा माझा शेवटचा कॉल, म्हणत कोल्हापुरातील फुटबॉलपटूने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:31 IST2025-06-11T12:30:44+5:302025-06-11T12:31:00+5:30
राजाराम तलाव परिसरात केले कीटकनाशक प्राशन

आई.. हा माझा शेवटचा कॉल, म्हणत कोल्हापुरातील फुटबॉलपटूने संपवले जीवन
कसबा बावडा : आई, हा माझा शेवटचा कॉल. मी आत्महत्या करतोय, असा फोन करून बावड्यातील फुटबॉलपटू तरुणाने राजाराम तलाव परिसरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्यास तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारदरम्यान त्याचे निधन झाले.
हर्षवर्धन अशोक काळे (वय २७, रा. माळ गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मनमिळावू असणाऱ्या हर्षवर्धनच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
एका पतसंस्थेत पिग्मी एजंटचे व एका खासगी शिक्षण संस्थेत लिपिकचे काम करीत असलेला हर्षवर्धन सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडला. राजाराम तलाव परिसरात त्याने कीटकनाशक प्राशन केले व आईला फोन केला. 'आई, हा तुला केलेला माझा शेवटचा कॉल आहे’, असे म्हणत त्याचे फोनवरील बोलणं बंद झाले.
तत्काळ मोबाइल लोकेशनवरून तो नेमका कुठे आहे याचा शोध घेण्यात आला. राजाराम तलाव परिसरात तो आढळला. त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर खासगी रुग्णालयात हलवले. पण, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याचा मित्रपरिवार मोठा असल्याने सीपीआर आवारात मोठी गर्दी झाली होती. हर्षवर्धन बावडा फुटबॉल क्लबचा उत्कृष्ट गोलकीपर होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.