कोल्हापुरात फुटबॉल हंगामास १ डिसेंबरपासून प्रारंभ; हंगाम शिस्तबध्द होण्यासाठी केएसएने जाहीर केले ४७ नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:17 IST2025-11-19T18:15:58+5:302025-11-19T18:17:02+5:30
केएसए साखळी स्पर्धेने हंगामाची सुरुवात : वेळापत्रक जाहीर : नियामावली, आचारसंहिता लागू

कोल्हापुरात फुटबॉल हंगामास १ डिसेंबरपासून प्रारंभ; हंगाम शिस्तबध्द होण्यासाठी केएसएने जाहीर केले ४७ नियम
कोल्हापूर : फुटबॉल शौकिनांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या कोल्हापूरच्याफुटबॉल हंगामाचा प्रारंभ सोमवार दि. १ डिसेंबर रोजी होणार आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित शाहू छत्रपती केएसए लिग फुटबॉल स्पर्धेने हंगामास सुरुवात होणार आहे. सेक्रेटरी राजेंद्र दळवी, जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांनी स्पर्धेची माहिती दिली.
संध्यामठ तरुण मंडळ आणि रंकाळा तालीम मंडळ यांच्यात १ वाजून ३० मिनिटांनी पहिली लढत होईल. उद्घाटनाचा सामना दुपारी चार वाजता पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्टस यांच्यात होणार आहे. दरम्यान, केएसएने स्पर्धेतील सामन्यांचे वेळापत्रक, नियम, आचारसंहिता तसेच संघांचे मानांकनही जाहीर केले आहे. सिनिअर- ८ गटातील सामने दुपारी १.३० वाजता आणि सुपर सिनियर-८ (वरिष्ठ गट) गटातील सामने सायंकाळी ४ वाजता होणार आहेत. हंगामात केएसए साखळी सामन्यातील स्पर्धेत विजयी संघाला तीन गुण मिळणार आहेत.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन शाहू छत्रपती केएसए साखळी फुटबॉल स्पर्धेतील ५६ सामन्यांचे वेळापत्रक तयार केले आहे. हंगाम शिस्तबध्द होण्यासाठी केएसएने सर्वसाधारण ४७ नियम जाहीर केले आहेत. संघ, व्यवस्थापन, खेळाडू, पदाधिकारी, प्रेक्षक, समर्थक यांनी या नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याशिवाय मैदानावरील आचारसंहिता, परगावी होणाऱ्या स्पर्धेत संघ व खेळाडू खेळविण्याबाबतचे नियमही जाहीर केले आहेत.
पाटाकडील संघ अव्वल स्थानावर
गतवर्षी झालेल्या शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लिग ए डिव्हिजन ते शारंग चषक फुटबॉल स्पर्धेनंतर मिळालेल्या गुणांनुसार समान गुण झालेल्या संघांमध्ये चिठ्ठ्या टाकून वरिष्ठ संघाचा मानांकन गुणतक्ताही केएसएने यावेळी जाहीर केला आहे. या यादीत पाटीकडील संघ अव्वल स्थानावर आहे.
संघ आणि त्यांचे गूण
-पाटाकडील तालीम मंडळ : ३८
-खंडोबा तालीम मंडळ : ३६
-श्री शिवाजी तरुण मंडळ : ३३
-संयुक्त जुना बुधवार पेठ : २७
-दिलबहार तालीम मंडळ : २५
-वेताळमाळ तालीम मंडळ : २४
-बालगोपाल तालीम मंडळ : २४
-सम्राटनगर तरुण मंडळ : २१
-संध्यामठ तरुण मंडळ : १६
-झुंजार क्लब : १५
-फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ : १५
-उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ : १२
-पाटाकडील तालीम मंडळ (ब) : १२
-प्रॅक्टिस फुटबॉल क्लब : ९
-सुभाषनगर फुटबॉल क्लब : ७
-रंकाळा तालीम मंडळ : ६