सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणार पाच वाघिणी, सोनार्ली कोअर एरियात लागले विलग्नवासाचे पिंजरे
By संदीप आडनाईक | Updated: October 18, 2025 13:24 IST2025-10-18T13:23:34+5:302025-10-18T13:24:26+5:30
वाघिणीला लावणार रेडिओ कॉलर

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणार पाच वाघिणी, सोनार्ली कोअर एरियात लागले विलग्नवासाचे पिंजरे
संदीप आडनाईक
कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्र स्थानांतरणाची प्रतीक्षा अखेरीस संपली आहे. ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पामधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आठ वाघांच्या स्थानांतरणासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये सर्वप्रथम पाच वाघिणींचे स्थलांतर होणार आहे. यासाठी चांदोली व्याघ्र प्रकल्पातील सोनार्ली कोअर एरियात विलग्नवासाचे पिंजरे तयार करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारकडून व्याघ्र स्थानांतरणाची प्रक्रिया अडकली होती. मात्र, गेल्या महिन्यात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघांचे स्थलांतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यासाठी मंजुरी दिल्याचे पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पाठवले आहे. यात पाच वाघिणी आणि तीन वाघांचा समावेश आहे.
दक्षिणेच्या बाजूने वाघांच्या नैसर्गिक स्थलांतराचे प्रमाण कमी असल्यामुळे २०२२ मध्ये सह्याद्री प्रकल्पात विदर्भातील वाघांचे स्थानांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला. गेल्या चार वर्षांमध्ये स्थानांतरणासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मोठी तयारी सुरू आहे.
वाघिणीला लावणार रेडिओ कॉलर
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन नर असल्याने सुरुवातीला वाघिणीचे स्थानांतरण करण्यास व्याघ्र प्रशासन आग्रही आहे. त्याठिकाणी वाघिणीला पकडून तिला रेडिओ काॅलर लावून सोनार्ली येथील विलग्नवासाच्या पिंजऱ्यात आणले जाईल. या पिंजऱ्यामध्ये काही दिवस ठेवून त्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र स्थानांतरणाच्या दृष्टीने आम्ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे. विलग्नवासाचे पिंजरे, वन कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. प्रकल्पात सध्या वाघांचे अस्तित्व असल्याने आम्ही सुरुवातीला वाघिणीच्या स्थानांतरणाला प्राथमिकता देणार आहोत. - तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प