संदीप मागाडे खूनप्रकरणी पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST2021-02-05T06:54:08+5:302021-02-05T06:54:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील संदीप सुरेश मागाडे (वय २७, रा. हराटी भाग, भीमराज भवनजवळ, ...

Five arrested in Sandeep Magade murder case | संदीप मागाडे खूनप्रकरणी पाच जणांना अटक

संदीप मागाडे खूनप्रकरणी पाच जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील संदीप सुरेश मागाडे (वय २७, रा. हराटी भाग, भीमराज भवनजवळ, कबनूर) याचा राजकीय वादातून खून झाल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानुसार पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य कुमार कांबळेसह चौदा संशयित व पाच ते सहा अनोळखी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पाच जणांना रविवारी अटक करण्यात आली आहे.

मुदस्सर खुदबुद्दीन घुणके (वय २१), शाहरुख आझाद शेख (२४), रोहन सतीश कुरणे (२०), राहुल अनिल शिंदे (२९, सर्व रा. कबनूर) व शाहरुख मुबारक अत्तार (२२, रा. जवाहरनगर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कुमार कांबळे, रवी कांबळे, रमजान सनदी, असिफ खटाळ, आकाश कांबळे, संकेत कांबळे, मोहसीन सनदी, राकेश कांबळे, ऋषिकेश वडर व पाच ते सहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कबनूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या वादाच्या कारणावरून संदीप याचा वरील संशयितांनी पाठलाग करून कोयता, तलवार, चाकूने त्याच्यावर वार करून शनिवारी (दि.२३) खून केला. घटनेनंतर संशयितांनी पळ काढला. या खूनप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून, अन्य फरार आहेत.

चौकट अंत्यसंस्कारावेळी कडक कारवाईची मागणी

मृत संदीप मागाडे याची रविवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत नातेवाइक, मित्र परिवार महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अंत्ययात्रेवेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही अंत्ययात्रा संदीपच्या घरापासून आंबेडकर चौक, कोल्हापूर रोड, कबनूर स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आली. स्मशानभूमीमध्ये श्रद्धांजली वाहताना संशयितांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तपास गतीने चालू आहे. काही संशयितांना ताब्यात घेतले असून, लवकरच उर्वरित आरोपींना पकडले जाईल. आपण कायदा व सुव्यवस्था न बिघडवता शांततेचे सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी केले. गावात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. संशयितांच्या घरासह प्रमुख चौकांत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: Five arrested in Sandeep Magade murder case