धनगर समाजाची पहिली गोलमेज परिषद शुक्रवारी कोल्हापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 18:50 IST2020-09-29T18:49:06+5:302020-09-29T18:50:33+5:30
गांधी जयंती दिनी शुक्रवारी कोल्हापुरातून पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचे रणशिंग फुंकले जाणार आहे. यासाठी पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन केले असून, राज्यातील धनगर समाजातील मान्यवरांना आमंत्रित केले आहे. धनगर आरक्षण समन्वय समितीने ही परिषद भरवली आहे, अशी माहिती निमंत्रक संदीप कारंडे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.

धनगर समाजाची पहिली गोलमेज परिषद शुक्रवारी कोल्हापुरात
कोल्हापूर: गांधी जयंती दिनी शुक्रवारी कोल्हापुरातून पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचे रणशिंग फुंकले जाणार आहे. यासाठी पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन केले असून, राज्यातील धनगर समाजातील मान्यवरांना आमंत्रित केले आहे. धनगर आरक्षण समन्वय समितीने ही परिषद भरवली आहे, अशी माहिती निमंत्रक संदीप कारंडे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.
शुक्रवारी (दि. २ ऑक्टोबर) सकाळी दहा वाजता दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून परिषदेला सुरुवात होणार आहे. कावळा नाका येथील अक्षता मंगल कार्यालयात होणाऱ्या या परिषदेत राज्यभरातील मोजके १०० नेते सहभागी होणार आहेत. उर्वरित समाज, अन्य लोकांसाठी थेट प्रसारणाची सोय करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे.
मराठा समाज आरक्षणानंतर आता आरक्षणातील फेरबदलाच्या मागणीसाठी धनगर समाजही पुन्हा एकदा पेटून उठला आहे. लढ्याची दिशा ठरावी, केंद्र सरकारवर एकमुखाने मागणी आणि दबावगट तयार व्हावा या हेतूने या परिषदेचे आयोजन केले आहे.
निर्णायक लढ्याचे रणशिंग
राजकीय पक्षाचे जोडे बाहेर काढून फक्त समाजाच्या हिताची भूमिका या परिषदेत घेतली जाणार आहे. शाहू महाराजांच्या भूमीतून निर्णायक लढ्याला सुरुवात होणार आहे. माजी मंत्री आण्णा डांगे, महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह सर्वपक्षीय धनगर समाजातील लोकप्रतिनिधी, नेते यांना या बैठकीसाठी आवर्जून बोलाविणे धाडण्यात आले आहे.