Fire at Trauma Care in CPR: Two killed | धक्कादायक! कोल्हापूरच्या सीपीआरमधील ट्रॉमा केअरला आग; दोघांचा मृत्यू

धक्कादायक! कोल्हापूरच्या सीपीआरमधील ट्रॉमा केअरला आग; दोघांचा मृत्यू

ठळक मुद्देसीपीआर मधील ट्रॉमा केअरला आग : दोघांचा मृत्यूझालेले मृत्यू आगीमुळे नव्हेत : सीपीआर प्रशासनाचा खुलासा

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाशी झगडणाऱ्या सीपीआर प्रशासनाला सोमवारी भल्या पहाटे अचानक लागलेल्या आगीशीही झगडा करावा लागला. कोरोनाचे रुग्ण असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरला पहाटे चार वाजता लागलेल्या आगीमुळे रुग्णालयात प्रचंड गोंधळ उडाला. अतिशय गंभीर अवस्थेत उपचार घेत असलेल्या १५ रुग्ण अन्य ठिकाणी स्थलांतर करुन त्यांना व्हेंटिलेटर जोडेपर्यंत दोन रुग्णांचा दुदैवांने मृत्यू झाला.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे मोठ्या ताणतणावात काम करत असलेल्या सीपीआर रुग्णालयात सोमवारची पहाट मोठे संकट घेऊनच आली. डॉक्टर्स, नर्स तसेच अन्य कर्मचाऱ्यांचा थरकाप उडविणारी घटना सीपीआर मध्ये घडली. पहाटे पावणेचार चारच्या सुमारास वेदगंगा बिल्डींगच्या तळमजल्यावर असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ही आग लागली.

या सेंटरमध्ये सगळ्या गंभीर रुग्णांवर उपचार सुरु होते. प्रत्येक रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. अचानक एका व्हेंटिलेटरमधून धूर यायला सुरवात झाली. काही वेळातच त्याने पेट घेतला आणि रुग्णालयात गोंधळ उडाला.

ड्युटीवर असलेल्या डॉक्टर्स, नर्स, वार्डबॉय, सुरक्षा रक्षकांनी तेथील पंधरा रुग्णांना अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरवात केली. पाठोपाठ अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशनम दलाचे जवान पोहचेपर्यंत सात आठ रुग्णांना तेथून बाहेर काढण्यात आले होते. जवानांनी नंतर पीपीई किट घालून तातडीने अन्य सात जणांना बाहेर काढले.

दरम्यान, पोलिस व जवानांनी फायर अक्सीग्युशनच्या सहायाने व्हेटिलेटरला लागलेली आग विझविण्यात यश मिळविले. दरम्यान, या सगळ्या धावपळीत एक सुरक्षा रक्षकाचा हात भाजल्याने जखमी झाला, तर एक कर्मचारी धुराने गुदरमल्याने बेशुध्द पडला. या दोघांची प्रकृती आता ठिक आहे.

अग्निशमन दल, वरिष्ठ , परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल जवान यांनी तात्काळ आग विझवली. या घटनेची माहिती कळताच जिल्हाधिकारी दौलत देसाई, वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, उपमुख्य अग्नशमन अधिकारी तानाजी कवाळे, मनिष रणभिसे यांच्यासह रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुख यांनी तातडीने धाव घेत लागलीच भेट देवून पाहणी केली.

मृत्यू आगीमुळे नाही - सीपीआर

दुर्दैवाने या आगीच्या घटनेमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. परंते त्यांचे मृत्यू हे आगीमुळे अथवा तेथे निर्माण झालेल्या धूरामुळे नाही तर दुसरीकडे स्थलांतर करुन तात्काळ व्हेंटिलेटर जोडेपर्यंत झालेल्या विलंबामुळे झाला असल्याचा खुलासा सीपीआर प्रशासनाने केला आहे. सीपीआरमध्ये पर्यायी व्हेटिलेटरची सोय करेपर्यंत काही रुग्णांना ऑक्सीजन बेडवर ठेवण्यात आले. अन्य रुग्णांची प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात आले.

सीपीआरमधील  आयसीयुमधीला एका कक्षा मध्ये इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आज पहाटे आग लागली होती. या कक्षातील १५ रुग्णांना वेळीच सुरक्षितरित्या स्थलांतरीत करण्यात आल्याने कोणत्याही प्रकारची जिवित हानी किंवा दुखापत झाली नाही.
चंद्रकांत मस्के, 
अधिष्ठाता, सीपीआर रुग्णालय.

तत्परतेमुळे वाचले अन्य रुग्रणांचे प्राण

सीपीआर रुग्णालयातील कर्मचारी, पोलिस, अग्नशमन दलाच्या जवानांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अन्य रुग्णांचे प्राण वाचले. जर वेळीच मदत झाली नसती तर मोठी घटना घडली असती. परंतू प्रसंगावधान दाखवून सर्वांनीच चांगले प्रयत्न केल्याने मोठी दुर्घटना टळली.

Web Title: Fire at Trauma Care in CPR: Two killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.