Kolhapur: लक्ष्मीपुरीत बेसमेंटमधील गोडाऊनला शॉर्टसर्किटने आग, लाखाचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:50 IST2025-12-25T16:48:29+5:302025-12-25T16:50:12+5:30
अग्निशामक दलाच्या तीन गाड्या आणि जवानांनी आग विझवली

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील भूपाल टॉवरच्या बेसमेंटला असलेल्या गोडाऊनमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली. गुरुवारी (दि. २५) दुपारी एकच्या सुमारास लागलेल्या आगीत रिकाम्या बाटल्या, बॉक्सचे पुठ्ठे आणि इलेक्ट्रिक साहित्य जळून सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. ताराराणी चौक आणि महापालिका येथील अग्निशामक दलाच्या तीन गाड्या आणि जवानांनी आग विझवली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भूपाल टॉवरमध्ये असलेल्या एका हॉटेलचे गोडाऊन इमारतीच्या बेसमेंटला आहे. या गोडाऊनमध्ये रिकाम्या बाटल्या आणि बॉक्सचे पुठ्ठे ठेवले होते. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास गोडाऊनच्या झरोख्यातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. हा प्रकार लक्षात येताच शेजारचे चहा टपरीवाले पांडुरंग चव्हाण आणि परिसरातील नागरिकांनी अग्निशामक दलास वर्दी दिली.
आठ ते दहा मिनिटांत ताराराणी चौक आणि महापालिकेतील अग्निशामक दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या. गोडाऊनला कुलूप असल्याने जवानांनी सुरुवातीला गोडाऊनच्या झरोख्यातून पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग जास्तच धुमसत असल्याने गोडाऊनचे कुलूप तोडून आग विझवली. सुमारे तासभराच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले. बघ्यांची गर्दी आणि प्रवाशांच्या वाहनांमुळे प्रमुख मार्गावर वाहनांची कोंडी झाली होती.