कोल्हापुरातील शॉर्टसर्किटने राजाराम साखर कारखान्याला आग, सुमारे ५ कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 11:43 IST2025-02-28T11:41:44+5:302025-02-28T11:43:04+5:30
आगीत तीन सिलेंडरचा स्फोट

कोल्हापुरातील शॉर्टसर्किटने राजाराम साखर कारखान्याला आग, सुमारे ५ कोटींचे नुकसान
कसबा बावडा : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. या आगीत मशिनरी विभागातील काही मशिनरी, विद्युत उपकरणे व ऑइलचे टँक जळून खाक झाले. त्यामुळे कारखान्याचे सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तब्बल दीड तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. शॉर्टसर्किटने ही आग लागली. घटनास्थळी कारखान्याचे चेअरमन आमदार अमल महाडिक तळ ठोकून होते. दोनच दिवसांपूर्वी कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता झाली होती.
सकाळी साडेदहाच्या सुमारास ही आग लागली. सुरुवातीला ही आग कर्मचाऱ्यांनी विजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग नियंत्रणाच्या पलीकडे गेली होती. काही वेळातच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग लागल्यानंतर थोड्याच वेळात तीन सिलिंडरचा एका पाठोपाठ स्फोट झाल्याने आगीचा भडका सर्वत्र मोठ्या प्रमाणात उडाला. काही क्षणातच आग दुसऱ्या मजल्यापर्यंत पसरली. दोनच दिवसापूर्वी राजाराम कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
गळीत हंगाम संपल्याने कारखान्याची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. कारखान्यात अनेक ठिकाणी बगॅस पडले होते. मोठ्या प्रमाणात सर्वत्र ऑइलही सांडले होते. काही ठिकाणी वेल्डिंगच्या साहाय्याने मशिनरी कट करण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असतानाच अचानक शॉर्टसर्किट झाले व जमिनीवर पडलेल्या ऑइल व बगॅसने पेट घेतला. मोठ्या प्रमाणात वायरिंगही जळू लागले. कोल्हापूर महापालिका अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांसह वडगाव तसेच परिसरातील चार टँकर आग विझवण्यासाठी कार्यरत होते. शहर पोलिस उपाधीक्षक अजित टिक्के, प्र. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.
कारखान्यात काही मशीनचे पार्ट कट करण्याचे काम वेल्डिंगच्या साहाय्याने सुरू होते. अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. - आमदार अमल महाडिक